कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी उमेदवारी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्याचे पाहायला मिळाले. केडीएमसीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले फैजल जलाल यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची कुणकुण लागताच, त्यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यालयाची वाट धरली. तिथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आणि जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेशाचा सोपस्कार पूर्ण केला. विशेष म्हणजे, अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी पक्षाचा ‘एबी फॉर्म’ही खिशात घातला. आज त्यांनी प्रभाग क्र. ८ मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे आपल्या प्रभागात क्लस्टर योजना राबविण्यासाठी शिवसेना शिंदे गटात गेले होते, मात्र प्रभाग क्र. ६ मधून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हाती मशाल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे शाखा अध्यक्ष संदीप पंडित यांना देखील मनसेने उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला.
कल्याण पूर्वेतील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता, मात्र अखेरच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गेली अनेक वर्षे भाजपात सक्रीय असलेले डोंबिवलीतील माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी भाजपातून उमेदवारी न मिळाल्याने मनसेच्या इंजिनात स्वार होत आपल्या मुलीसह मनसे पक्षातून प्रभाग क्र. २५ मधून तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये दाखल झालेल्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांना देखील उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपातर्फे देण्यात आले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी देखील मनसे पक्षातून उमेदवारी अर्ज भरला आहे. डोंबिवली शिवसेना शिंदे गटातील विभाग प्रमुख अमोल पाटील यांच्या पत्नी लीना पाटील यांनी मनसेतून तसेच शिवसेना शिंदे गटातीलच संदेश पाटील आणि त्यांच्या पत्नी रसिका पाटील या दोघांनी देखील मनसेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.