प्रियंका वाड्रांना केरळ हायकोर्टाची नोटीस

0

नवी दिल्ली : केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रां यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या संदर्भात आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर त्यांचे उत्तर मागवले आहे. भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी वायनाड मतदारसंघातून प्रियंका गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. नव्या हरिदास यांचा आरोप आहे की, प्रियंका गांधींनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती योग्यरीत्या जाहीर केली नाही. नव्या यांच्या दाव्यानुसार प्रियंका गांधींनी जाणीवपूर्वक संपत्तीची माहिती लपवली, जेणेकरून निवडणुकीचा निकाल प्रभावित होईल. हे वर्तन “भ्रष्ट आचारधर्म” म्हणून गणले जाऊ शकते. वाड्रा यांनी खोटी माहिती देऊन आचारसंहितेचाही भंग केला असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार आहे.

प्रियंका वाड्रा यांनी निवडणूक अर्जात १२ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्याकडे ४.२४ कोटींची चल संपत्ती आणि ७.७४ कोटींची अचल संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्याशिवाय, त्यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मालमत्तेचाही तपशील दिला होता. वाड्रा यांच्याकडे एकूण ६५.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यामध्ये ३७.९ कोटींची चल मालमत्ता आणि २७.६४ कोटींची अचल मालमत्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वायनाड जागा सोडली. त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने प्रियांका गांधी यांना उमेदवार म्हणून उभे केले. ही प्रियांका गांधींची पहिली निवडणूक होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech