राजकुमार रावच्या ‘भूल चुक माफ’ चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनावर हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

0

मुंबई : राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘भूल चुक माफ’ या बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटावर आता संकट ओढावलं आहे. १६ मे २०२५ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनावर उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही कारवाई PVR आणि INOX या मल्टिप्लेक्स साखळ्यांनी दाखल केलेल्या ६० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या खटल्यानंतर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकुमार रावसह, चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. आता चाहत्यांना चित्रपटासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पीव्हीआरने चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत ‘भूल चुक माफ’च्या ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. कंपनीने दावा केला की, चित्रपटासाठी पूर्वनियोजित प्रमोशन आणि अ‍ॅडव्हान्स तिकीट विक्री सुरू केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांत सिनेमा प्रदर्शन नाकारून थेट OTTवर रिलिज करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा पीव्हीआरने केला. तसेच प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलं.

कोमल नाहटा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “पीव्हीआर-आयनॉक्सने मॅडॉक फिल्म्सवर ‘भूल चुक माफ’ चित्रपट प्रदर्शित न झाल्याबद्दल ६० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. पीव्हीआर-आयनॉक्सच्या मते, खराब अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे मॅडॉकने अचानक (९ मे रोजी) चित्रपटगृहातून चित्रपट प्रदर्शित करणे रद्द केलं. तर भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचा दावा मॅडॉक कंपनीने केला आहे”.

करण शर्मा दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित’भूल चुक माफ’ हा चित्रपट आधीच थिएटरमध्ये प्रदर्शन न होण्यानं चर्चेत होता. आता OTTवरही स्थगिती मिळाल्यामुळे निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे. वाराणसीतील पार्श्वभूमी असलेली एक अनोखी प्रेमकथा आणि टाइम लूपचा अनोखा कॉन्सेप्ट असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता होती. आता या प्रकरणात पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech