मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मनरेगाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेला अचानक धार्मिक आणि राजकीय वळण मिळाले. मनरेगा मजुरांच्या थकीत वेतनावरून सरकारला धारेवर धरणाऱ्या भास्कर जाधवांनी ‘जय श्रीराम’ शब्दाचा वापर करताच, भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक झाल्या. मात्र, या गोंधळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्याच महिला आमदाराला खडेबोल सुनावल्याने सभागृहात एकाच खळबळ उडाली.
विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मनरेगा मजुरांच्या ४-४ वर्षांपासून रखडलेल्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला. “तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?” अशी मिश्कील कोपरखळी जाधवांनी मारताच भाजपच्या देवयानी फरांदे संतापल्या. त्यांनी चक्क मागचा बाक सोडून थेट पहिल्या रांगेत धाव घेतली आणि जाधवांच्या भाषणात अडथळा आणत त्यांना ‘जय श्रीराम’ बोलण्याचा आग्रह धरला.
आमदार फरांदे यांचा हा अवतार पाहून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने हस्तक्षेप केला. फरांदे यांना फटकारताना अध्यक्ष म्हणाले, “देवयानी ताई, तुम्ही तातडीने आपल्या जागेवर जाऊन बसा. तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळाले आहेत असे समजू नका.” अध्यक्षांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे सत्ताधारी बाकांवर शांतता पसरली.
अध्यक्षांनी फरांदे यांना सुनावल्यानंतर भास्कर जाधवांनीही संधी सोडली नाही. “मॅडम, तुमची विद्वत्ता एवढी मोठी आहे की ती मला परवडणारी नाही,” असा टोला लगावत त्यांनी फरांदे यांची फिरकी घेतली. अखेर मजुरांच्या प्रश्नावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला. या संपूर्ण नाट्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला.