दादा विरुद्ध भाई संघर्ष किती दिवस चालणार

0

– नितीन सावंत

नवी मुंबईचे सर्वेसर्वा वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संघर्ष निवडणुकीच्या निकालानंतर थांबेल अशी अपेक्षा होती. परंतु निकालानंतर सुद्धा हा संघर्ष सुरूच आहे. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनीच घोषणा केली होती की निवडणूक झाली आता आमचे भांडण संपले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयम राखून गणेश नाईक यांना कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. परंतु एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक हे नवी मुंबईतील जमिनी हडप करत असल्याचा आरोप निवडणुकीच्या तोंडावर केला होता. त्यालाही गणेश नाईक यांनी उत्तर दिले त्याचबरोबर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा असे आव्हान ही त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. मात्र स्वतः एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात ब्रही काढलेला नाही.

दोन दिवसांपूर्वी ठाण्यात येऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नव्याने आरोप केले. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांमध्ये पक्षश्रेष्ठींनी शिंदे सेने सोबत युती करण्याचे आदेश दिले नसते तर येथेही भाजपने बहुमत मिळवले असते, असा दावाही गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन केला. त्यामुळे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष संपण्याऐवजी आता वाढत चालला आहे. खरे म्हणजे निकालानंतर गणेश नाईक यांनी हा संघर्ष संपल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गणेश नाईक हे आता शांत बसतील असे वाटत होते. खरे म्हणजे संघर्ष करणे, टीका करणे हा गणेश नाईक यांचा स्वभाव नाही. नवी मुंबईतही त्यांनी सुरू केलेला संघर्ष हा भाजप पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसारच होता.

नवी मुंबईत एक हाती सत्ता आल्यानंतर हा संघर्ष थांबवण्याचे गणेश नाईक यांची इच्छा होती. मात्र आपण गप्प बसू नका ,आपला संघर्ष सुरू ठेवा असा आदेश पक्षाकडून आल्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला शिंगावर घ्यायचे ठरवले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईचे राजे असले तरी पालघरचे ते पालकमंत्री आहेत. पालघर मध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजपशी युती न करता एकनाथ शिंदे यांनी या जिल्ह्यातील नगराध्यक्ष स्वबळावर निवडून आणले होते. पालघर जिल्ह्यात मात्र गणेश नाईक आपली ताकद दाखवू शकले नाहीत. १९९५ मध्ये युती सरकार असताना गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पालघर जिल्हा हा स्वतंत्र झाला नव्हता. तो ठाणे जिल्ह्यातच होता. तेव्हाही ते आपला प्रभाव या जिल्ह्यात पाडू शकले नाही. त्यावेळी या जिल्ह्यात एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती.

२००१ पूर्वी तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा पूर्ण ठाणे जिल्ह्यात दबदबा होता. त्यावेळी गणेश नाईकही आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. १९९९ मध्ये गणेश नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधून लढताना पराभव झाला. २००१ मध्ये आनंद दिघे यांचे दुःखद निधन झाल्यानंतर ठाण्याचा कारभार एकनाथ शिंदे, कै.अनंत तारे आणि राजन विचारे यांच्याकडे होता. पुढे एकनाथ शिंदे हे जिल्हाप्रमुख झाले. राजन विचारे यांनी त्यांच्यासोबत जुळवून घेतले. तर कै. अनंत तरे हे एकनाथ शिंदे यांच्याशी संघर्ष करत राहिले. प्रत्येक वेळी मातोश्रीने एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने कै. तरे हतबल झाले. शेवटी ते अकाली गेले.

१९९९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर गणेश नाईक यांनी आपले लक्ष फक्त नवी मुंबईत केंद्रित केले. २००४ पर्यंत ते मंत्रालय किंवा विधान भवनाची पायरी ही चढले नव्हते. २००४ साली ते पुन्हा बेलापूर मधून निवडून येऊन थेट मंत्री झाले. शिवसेना सोडल्यानंतर कै. बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना यांच्यावर त्यांनी खाजगीतही टीका केली नाही. ऑफ दि रेकॉर्ड कुणी विचारले तरी ते शिवसेना किंवा शिवसेना प्रमुख या विषयावर बोलणे टाळत असत. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईत आपली एक हाती सत्ता राखली. ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाची सत्ता नवी मुंबई महानगरपालिकेत असते. ही सत्ता सुद्धा त्यांनी कुणावर टीका न करता राखली.

आज नवी मुंबईच्या विकासात वनमंत्री गणेश नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारणार नाही. या शहराला आकार देताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. कट – कमिशन या गोष्टींना नवी मुंबईत थारा नाही हे गणेश नाईक छातीठोकपणे सांगतात. मात्र यावेळी नवी मुंबईच्या विकास आराखड्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपांचा भडीमार सुरू केला आहे. जेव्हा विकास आराखडा झाला त्यावेळी गणेश नाईक गप्प बसले मात्र आता विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देताना ते एकनाथ शिंदे यांना का लक्ष करत आहेत याचे उत्तर तेच देऊ शकतात.

– नितीन सावंत,  9820355612

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech