हवाईदलात होणार ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश

0

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात लवकरच ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे भारत देखील अमेरिका, इस्त्रायल आणि ब्रिटनसारख्या देशांच्या यादीत सहभागी होईल. या विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय उच्चस्तरीय बैठकीत मंजुरीसाठी आपला प्रस्ताव ठेवणार आहेत. या प्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार कोटी रुपये असेल. आय-स्टार विमाने ही उच्च-उंचीवरील गुप्तचर विमाने म्हणून ओळखली जातात. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाला रडार यंत्रणा, मोबाइल हवाई सुरक्षा प्रणालीसारख्या शत्रूच्या लक्ष्यांवर अचूक हल्ले करता येतील.

भारतीय लष्कराच्या पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय या महिन्याच्या अखेरीस उच्चस्तरीय बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याची अपेक्षा आहे. आधुनिक आय-स्टार गुप्तचर विमान डीआरडीओच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्सने विकसित केलेल्या स्वदेशी प्रणालींनी सुसज्ज असेल. त्यांची यशस्वी चाचणी आधीच घेण्यात आली आहे. आय-स्टार विमानाचा वापर उच्च उंचीवरील गुप्तचर माहिती गोळा करणे, देखरेख करणे, लक्ष्य ओळखणे आणि हल्ल्यासाठी केला जाईल. हे विमान दिवसा आणि रात्री कोणत्याही हवामानात काम करू शकेल. याद्वारे शत्रूच्या हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवता येईल. आय-स्टार प्रणाली हवाई आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी काम करेल आणि भारतीय सैन्याच्या सुरक्षा क्षमतांमध्ये अनेक पटीने वाढ करेल. यामुळे देशाला वेळेवर धोके ओळखण्यास आणि त्यांना प्रतिसाद देण्यास मोठी मदत होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech