कल्याण पश्चिम विधानसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा झंजावती दौरा
कल्याण : कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपाचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून कार्यकर्त्यांनी जोर लावल्यास विरोधकांना एकही जागा मिळणार नाही. सगळीकडे शिवसेना भाजपाचे तगडे उमेदवार असून शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणखी जास्त काम केल्यास एकही विरोधक निवडून येणार नाही असा विश्वास कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. टिटवाळा येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना शिंदे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, प्रभाग क्र. 3 चे उमेदवार संतोष तरे, उपेक्षा भोईर, हर्षाली चौधरी, बंदेश जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण – डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रभाग क्रमांक १ ते १० या प्रभागांमध्ये श्रीकांत शिंदे दौरा करून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रामुख्याने शिवसेना, भाजपा, रिपाइं महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवारांशी संवाद साधला आणि प्रभागातील प्रचाराबाबत आढावा घेतला. महायुतीच्या माध्यमातून विकासाची कामे सुरू आहेत. 3 नंबर पॅनल मध्ये अनुभवी लोकं असून त्यांनी टिटवाळा येथे चांगलं काम केलं आहे. महायुतीच्या माध्यमातून रिंगरोड, सॅटिस, मेट्रो तसेच इतर अनेक कामे सुरू आहेत. तिकिटं न मिळाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले आहेत मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर ते सर्व पुन्हा परत येतील. पक्षासाठी जो कार्यकर्ता काम करतो पक्ष त्याची जाण ठेवतो. त्यामुळे जास्तीत जास्त काम करून सर्व उमेदवार निवडून आणा असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.