किरण सोनावणे
भोंदूगिरी नवीन नाही की भोंदू बाबा नवीन नाही. खरा प्रश्न हा आहे की, ही भोंदूगिरी बाबाची पैदास का होते ? याचा शोध घेतला पाहिजे. देव, धर्म यासंकल्पना अगदी आदिमानवा पासून आपल्याला पाहायला मिळतात. त्याकाळातही व्यक्ती हतबल झाला की, आपल्या बुद्धीची हत्यारे खाली टाकून कुठल्या तरी अद्भुत, अलौकिक, अचाट अश्या शक्तीची कल्पना करून त्याची करुणा भाकत असे. त्याचा त्याला किती फायदा होत असे की, होत नसे हा वेगळा मुद्दा मात्र त्याचे एक समाधान होत असे की, मी सर्व प्रयत्न केले, आता मला काही सुचत नाही, आता मी या निसर्गातील सर्वशक्तिमान शक्तीला सांगितलं आहे, आता तोच काय करायचा असेल तर चमत्कार करेल. त्याच्या १०० प्रयत्नातून १०/१५ प्रकरणात जरी यश मिळाले असेल तर तशी त्याची त्या प्रार्थना आणि शक्तीवर विश्वास बसू लागला, ज्यात यश नाही मिळाले त्यात ईश्वराची मर्जी नव्हती असे मानून तो प्रार्थना, पूजा करीतच राहिला. त्यात जस जसे त्याला निसर्गाचे नियम, उमजू लागले, नवे नवे शोध लागू लागले , तो त्याचा उपयोग तो आपल्या समस्या सोडविण्यासाठी करत असे आणि ज्या नाही उमजल्या त्यासाठी तो ईश्वर किंवा ईश्वराचा माध्यम म्हणून बाबा, बुवा किंवा साधू कडे तरी जात असे. यातूनच भोंदूगिरीचा उदय झाला. मात्र सोबत मनुष्याच्या ज्ञानाच्या विज्ञानाच्या कक्षा विस्तारत होत्या तस तसे हे बाबा बुवा मनुष्याच्या जीवनातून कमी कमी होत जात होते. पूर्वी कुठलाही आजार झाला की लोक कुठल्या तरी मंदिर किंवा देवऋषी कडे जात, तो जे पाणी, अंगारा धुपारा देत असे, काही मंत्र सांगत असे त्याचा येऊन व्यक्ती उपयोग करत असे. मात्र यातून आजारी व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती दांडगट असे तो वाचत असे आणि त्याला देवाचा किंवा देवऋषीचा चमत्कार म्हणून प्रचारित केले जाई, मी असे १९७० ते ८० च्या काळात अनेक हिंदू आणि मुस्लिम बाबाचे दरबार पाहिले आहेत, त्यात असणारी शेकडो हिंदू – मुस्लिम लोकांची गर्दी देखील पाहिली आहे. मात्र ज्ञानाचा जसा विस्फोट होत गेला त्या पद्धतीने भोंदूगिरीचे देखील नवी नवी आधुनिक रूपे समोर येऊ लागली. तुम्हाला आठवत असेल की सत्तरच्या दशकात तुम्ही अनेकांना भूतबाधा झाल्याचे, करणी केल्याची, जादू टोना केल्याची उदाहरणे गावोगावी आणि शहरात देखील असत, आजकाल अशी प्रकरणे दिसत नाहीत ? भूत गायब झाले की भूत हा आपला भ्रम होता हे लोकांना उमजले ?
तर, मी आधुनिक भोंदूगिरी बद्दल बोलत होतो. नव्या भोंदूगिरने परस्पर फायद्यासाठी राजकारणासोबत युती केली त्यामुळे ही भोंदूगिरी कुठे कथा वाचकाच्या माध्यमातून, कुठे सहस्र कुंडिय यज्ञ, रुद्र, महारुद्र पूजा, भविष्य कुंडली च्या माध्यमातून कालसर्प योग, ग्रहपूजा असे नवे आणि आधुनिक फंडे आले. पूर्वीचे बाबा जसे भयंकर दिसत, तसे आताचे बुवा बाबा भयंकर दिसत नाहीत तर अतिशय सुंदर डेकोरेटीव्ह पेहराव, हातात आधुनिक यंत्र, वातानुकूलित कक्ष किंवा दरबार यात भोंदू बाबा बसू लागले.
त्यात भारता सारख्या महाकाय लोकसंख्या असणाऱ्या देशात मागणी प्रचंड पण पुरवठा अतिशय कमी अशा परिस्थिती मनुष्य दैववादी आणि भ्रष्टाचारी होणार नाही तर काय ? मग नोकरी, ऍडमिशन, ठेका, उद्योग यासर्वच क्षेत्रात असंख्य लायक व्यक्ती स्पर्धा करीत असतात. साधे मेडिकलच्या ॲडमिशनचे घ्या. एका जागेसाठी जर सारखी गुणवत्ता असणारे २००० विद्यार्थी असतील तर निवड कशी होणार ? त्यामुळे मग देवाला कौल लावला जातो, नवस बोलला जातो किंवा बाबा, बुवा यांच्याकडून काही पूजा किंवा भविष्य पाहणाऱ्याकडून कुठले तरी यंत्र, खडा आणून तो परिधान केला जातो. निवडणूक हे देखील भोंदूगिरीचे उत्तम उदाहरण आहे. एकाच प्रभागातून १०/१५ उमेदवार उभे रहातात, त्यापैकी ९०% टक्के उमेदवार हे कुठल्या तरी ज्योतिष, बाबा बुवा कडे फॉर्म भरण्याची तारीख, वेळ काढून आणतात. काही नवस बोलून तर काही पूजा करून तर काही देवाला अर्ज करून येतात.
एक मजेशीर किस्सा आठवला, क्रिकेट बुकीचा व्यवसाय मोठ्या तेजीत होता, माझ्या परिचित एक बुकी मॅच संपली की शिर्डीला जात असे, मी विचार करायचो अरे याने याच्या घरी एवढा मोठा सुंदर देव्हारा बनवला आहे, शहराच्या आसपास इतकी साईबाबांची मंदिरे आहेत मग हा उठसूठ शिर्डीला का जातो ? तेंव्हा एकदा त्यालाच थेट प्रश्न विचारला, आप घर मे या शहर मे मंदिर होते हुये शिर्डी क्यो जाते हो, तेंव्हा तो म्हणाला मैने बाबा की अपना पार्टनर बनाया है, मैं जितना कमाता हू, उसका आधा हिस्सा बाबा को देकर आता हू. याचा अर्थ अंधश्रद्धा किती टोकाची असू शकते याचे हे उदाहरण, नंतर असे समजले की, हा असा एकमात्र व्यक्ती नसून अशी शेकडो बरे वाईट उद्योग करणारे असे करतात.
अशा अनेक गोष्टी मुळे ज्या कथा वाचक, भोंदू बाबा, ज्योतिष, तीर्थक्षेत्र, दरबार जिथे हजारो लोकांची गर्दी असते तिथे स्थानिक राजकारणी आपली हजेरी लावू लागले. राजकारण्याच्या पाठोपाठ अधिकारी आणि इतर उद्योगी जाऊ लागले त्यातून एक बाबाच्या मठाभोवती त्या वस्तीत, शहरात, जिल्ह्यात किंवा राज्यात समांतर सरकार सुरू झाले. तुम्ही छोट्या मोठ्या गावात, तालुक्यात, शहराच्या ठराविक वस्तीत गेलात तर असे धार्मिक केंद्र तुम्हाला सहज सापडेल. याने राजकारणी लोकांचे आयते फावले, त्यांचे काम सोपे झाले. त्याचे मतदार बाबाच्या पाठी आणि हा नेता बाबाच्या सेवेत. यातून राजकारणाचे लोकशाहीकरण होण्या ऐवजी धार्मिक अंधानुकरण झाले, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आधी झालेच होते, त्यात धार्मिकदाबावाचे नवे हत्यार राजकारणाच्या हातात आले. नेत्याच्या एका हाताला धार्मिक गुंड, बाबा आणि त्याची फौज तर दुसऱ्या हाताला सामाजिक गुंड असे चित्र आज समाजात आहे. कोट्यवधीचे भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना आणखी काय हवे होते ?. फक्त गुंडांना कुठल्या तरी एरियात हप्ता वसुली. किंवा कसला तरी गैर उद्योग करण्याची मुभा आणि भोंदू बाबाला काय हवे तर त्याच्या दरबारात बडे अधिकारी, राजकारणी आले की सामान्य मूर्ख लोक त्याच्याकडे येणार म्हणजे येणारच यातून तिघांच्या वेगवेगळ्या गरजा तर पूर्ण होतातच शिवाय अनेक प्रकरणात राजकारणी लोकांना आपली मांडवली करण्यासाठी या सभ्य चेहऱ्याच्या बाबा, बुवांचा तर दम देण्यासाठी गुंडांचा फायदा होत आला. त्यामुळे अर्धवट, नाक्यावरचे भाई, टपोरी हे नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री, मुख्यमंत्री बनू लागले, उत्तर प्रदेश मध्ये आणि अनेक राज्यात चक्क एकेकाळी बाबा असलेलेच मुख्यमंत्री झाले, गेल्या ४/५ निवडणुका पहिल्या तर अनेक बाबा निवडणुकीला उभे राहिल्याचे आपल्याला दिसेल.
याचा परिणाम असा झाला की, अभ्यासक, विचारवंत, संशोधक, वैज्ञानिक, विवेकवादी विचारधारा मागे पडली. त्यांना कुठलाही वाव सध्याच्या राजकारण आणि समाजकारणात उरला नाही . उलट याचा विपरीत परिणाम असा झाला की, फायद्यासाठी विचारवंत, अभ्यासक यांनी आपली वैचारिक सुंता करून घेऊन दीड दमडीच्या राजकारणी दादा, भाई, अण्णा, तात्या यांच्या प्रतिमा उंचावण्याचा सुपाऱ्या घेऊन सत्तेच्या ताटातील मलई आपल्या ताटात घेण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे समोर जरी दिसत नसले तरी अशा शेकडो लाचार, पत्रकार, विचारवंत, आयडियाबाज लोकांची फौज दीडदमडीच्या नेत्यांचे प्रतिमा उंचावण करीत असतात. त्यांचे रिल्स, फ्लेक्स, त्यांना भाषणाचे मुद्दे, डायलॉग, वेशभूषा, केशभूषा असे सर्व टिप्स ते देत असतात.
मी जे सांगतो आहे ते काही नवीन नाही. आपले संत, महापुरुष हजारो वर्षापासून सांगत आले आहे, त्यामुळे तत्कालीन गुंड व्यवस्थेने त्यांचा छळ, त्यांना बहिष्कृत करणे, इथ पासून ते त्यांचा खून करणे असे प्रकार केले आहेत कारण लोक शहाणे झाले तर यांचे बिन बोभाट चाललेले उद्योग बंद पडतील, यांना सर्व सामान्य लोकांचे शोषण करता येणार नाही. त्यामुळे ज्याने ज्याने असे प्रयत्न केले त्याला त्याला तत्कालीन मंबाजीनी त्रास दिला हा इतिहास आहे.
आज आपण संतांचे सप्ताह भरवतो पण त्याच्याकडून अक्कल घेत नाही, पोकळ अंधभक्ती घेतो. संतानी जी मानवी मूल्य सांगितली ती घेतली नाही.
लेक हात में भगवी झेंडी रे क्या करम करे पाखंडी…..
नवसे कन्या पुत्र होती , तर का करणे लागे पती,
जत्रा मे बिठाया फत्रा, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, पैसे की, धुलधानी …..
अशी हजारो उदाहरणे मी देऊ शकतो..
संतानी ज्ञान, प्रेम, शील, करुणा, मैत्री आणि बंधुत्व शिकवले, भोंदूगिरी पासून सावध रहा सांगितले मात्र आपण त्यांच्या खऱ्या शिकवणीला बगल देऊन समाजात अंधभक्ती पसरविण्याचे काम केले. त्यामुळे ही आताची परिस्थिती अशीच राहिली तर कॅप्टन खरात हे आता ताजे प्रकरण आहे ते थोडे दिवस रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या नंतर थंड पडेल, जर यात चाकणकर नसत्या तर एवढे चर्चेत हे प्रकरण आले नसते, प्रसार माध्यमे इतक्या मोठ्या प्रमाणात ते उचलत आहेत याचा अर्थ सरकारचा देखील यामागे काही अजेंडा असू शकतो. नाहीतर शहरातील अनेक धार्मिक केंद्रात महिलांचे शोषण हे संमतीने फायद्यासाठी किंवा मजबुरीचा फायदा उचलत किंवा ब्लॅक मेल करत सुरूच असते. आज मोठ्या बिल्डर, उद्योगपती यांना कोट्यवधीचे कर्ज देणारे कोण आहेत याचा शोध घेतला तर कर्ज आणि त्यावर व्याज वसूल करणे हा धार्मिक बाबांचा मोठा धंदा आहे. मी ज्या शहरात रहातो त्या ठिकाणचा हा माझ्या माहितीतील प्रकार आहे, काही वर्षापूर्वी तर हे कथा वाचक बाबा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग करीत असल्याचा भांडा फोड स्टार प्लस या वृत् वहिनीने केला होता त्यात किरीटभाईजी पासून अनेक धार्मिक चेहऱ्यामागील भामटे समोर आले होते.
यावर उपाय काय ? यावर उपाय म्हणजे ज्यांचा ज्यांचा नैतिक मूल्यावर विश्वास आहे अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्वात पहिली गोष्ट केली पाहिजे म्हणजे अशा कुठल्या देवस्थान, धार्मिक स्थळ, बुवा, ज्योतिष , मुल्ला यांच्याकडे जाणे बंद केले पाहिजे, त्यांना देणगी देणे,कुठल्याही धर्माच्या दानपेटीत पैसे टाकणं बंद करणे ही पहिली पायरी. कारण देव जर सर्व शक्तिमान आहे तर आपण त्याला पैसे देऊन त्याचा अपमान करत असतो. देवाला तुमची दैवी मूल्यावर असणारी श्रद्धा आणि भक्ती हवी असते, ही दैवी मूल्य कुठली तर सत्य, अहिंसा, करुणा, प्रेम, बंधुत्व, शीलवान असणे त्याच्यासाठी महत्वाचे असते. तुम्ही कसाही नंगा नाच कराल आणि देव तुम्हाला पावेल , हा तुमचा भ्रम आहे. त्यामुळे घरातील देव्हाऱ्यात जो कुणी तुमचा देव असेल त्याची तुमची जशी श्रद्धा असेल तशी पूजा करा दान द्यायचे असेल तर शिक्षणासाठी, हॉस्पिटल मध्ये गरजुला उपचार करण्यासाठी, गरजवंताला कपडे किंवा उद्योग करणाऱ्या तरुणाला उद्योगासाठी दान द्या. जर दर महिन्याला आपण हजार रुपये दान करत असू तर असे केवळ १००० लोक एकत्र येऊन , कुठल्याही बेरोजगार तरुणाला छोटा व्यवसाय करण्यासाठी भरीव मदत करू शकता.
दुसरे म्हणजे धार्मिक सप्ताह हे बाबा लोकांचे उत्पन्नाचे मोठे साधन असते, यातून ते आपली शक्ती आपल्या राजकीय आका (बॉस) दाखवीत असतात आणि त्यातून त्याच्याकडून लाखो रुपये उकळून तुम्हाला भंडारा देत असतात, त्यामुळे अशा सप्ताह मध्ये जाण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या परिसरात व्याख्यानमाला सुरू करून विचारवंत, वैज्ञानिक, अभ्यासक यांना बोलावून त्यांच्याकडून जग नेमके कुठे जाते आहे, नव्या युगात आपल्यासमोर कुठली आव्हाने आहेत ? देशाची आर्थिक व्यवस्था कशी आहे ? नवे शोध आणि तंत्रज्ञान कुठले आले आहे ? यात भले तुम्ही वेद , कुराण, बायबल, अवेस्ता, तुलमुद असे विविध धर्माचे धर्म ग्रंथ समजून सांगणारे किंवा येणाऱ्या AI च्या जगात स्वतःला आणि देशाला पुढे नेण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत व्याख्याने आयोजित केली तर नव्या मुलांच्या मेंदून नव्या कल्पना आणि विवेकवादी दृष्टिकोन रुजला जाईल तिसरे म्हणजे चित्रपट, नाटक आणि मालिका मधून मोठ्या प्रमाणात दैववाद पोसला जातो. जरा काही चांगले झाले की महापूजा किंवा जरा काही संकट आले की नवस आणि प्रार्थना.
अशा सिरियल पाहणे बंद करा या एवजी एपिक चॅनेल, डिस्कवरी चॅनेल पाहण्याची सवय आपल्या मुलाना आणि स्वतःला लावा. कारण साधे समीकरण आहे, तुमच्यात दैववाद पेरला की, तुमच्या मेंदूचे पाकीट अलगदपणे मारता येते, एकदा का तुम्हाला बुद्धीबधीर केले की, एखाद्या कळसूत्री बाहुली प्रमाणे तुमच्याकडून हवे ते करून घेता येऊ शकते, मग तुमच्या मुली, बायको, बहीण हिच्याशी शरीर संबंध करायचे ठरवले तरी भोंदू बाबा सहज करू शकतो हे खरात प्रकरणा पूर्वीही हजारो प्रकरणात उघडकीस आले आहे.
त्यामुळे तुमचा देव आणि धर्म हा तुम्हाला अधिक शहाणे करणारा, अधिक चांगला माणूस करणार असला पाहिजे. कुठल्याही देवाला देवपण हे कष्ट आणि तप केल्याशिवाय आणि कठीण परीक्षा दिल्याशिवाय मिळत नसेल तर तो देव आणि त्याचा भामटा भक्त तुम्ही काही कष्ट मेहनत तप न करता कुठल्या तरी मंत्र तंत्राने, पूजेने, जादूने तुमच्या पेक्षा लायक व्यक्तीला सोडून तुम्हाला ते देईल ? असा प्रश्न तुम्ही का विचारत नाही , माझा तरी विश्वास नाही, तुम्ही अंध विश्वासू आणि मूर्ख असाल तर तुम्ही अशा व्यवस्थेचे ग्राहक आणि पोशिंदे आहात, नव्या पिढी साठी तुम्ही आणखी नवा आणि मजबुत ट्रॅप निर्माण करत आहात, इतके लक्षात ठेवा मग यात तुमची पत्नी, लेक, बहीण, सून कुणीही बळी जाऊ शकते. कारण बुद्धी बधिरता ही असतेच तशी. पुण्यातील एका दांपत्याने चक्क दोन कोटीची मालमत्ता अश्याच भोंदू पती पत्नीच्या नावे करून स्वतः आता भाड्याच्या घरात राहून पोलिस स्टेशनच्या चकरा मारतो आहे. तुम्ही आजुबाजूला डोळसपणे पाहिले तर अशी शेकडो लोकं तुम्हाला दिसतील सर्वात शेवटचे म्हणजे खरात नालायक होता, त्याला देवाने शिक्षा केली मात्र माझे गुरू, माझा बाबा, माझा ज्योतिषी, माझी बैठक अशी कशी नाही असे बोलून याच चरकात मान घालून पिळत रहाणारे ही व्यवस्था चालवत असतात…हे बंद करा मी जे मनापासून सांगितलं ते तुम्ही इथ पर्यंत वाचले , आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, मी जे सांगितलं त्यावर अंधतेने विश्वास ठेवू नका, तुमच्याही धडावर तुमचे डोके आहे, विचार करा, चिंतन करा, योग्य वाटले तर इतराना सांगा कारण आपण जोक्स, चुघल्या सर्वांना आवडीने सांगतो त्या असे काही सांगा.

किरण सोनावणे
९९२२६६६६०७