नियोजित पत्रकार भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही सुरू व्हावे – पालकमंत्री

0

रत्नागिरी : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून पत्रकार देखील आयएएस, आयपीएस निर्माण करू शकतात, हा संदेश महाराष्ट्रभर द्यावा. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मिरजोळे एमआयडीसी येथे बांधण्यात येणाऱ्या पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण रविवारी, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी झाले. त्यानंतर सामंत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रांताधिकारी जीवन देसाई, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर, अलिमियाँ काझी, किशोर मोरे, हेमंत वणजू, आनंद तापेकर, राजेश शेळके, मेहरून नाकाडे, जान्हवी पाटील, उज्ज्वला पंगेरकर, राजेंद्र चव्हाण, राकेश गुडेकर, मनोज लेले, अमोल मोरे आदी पत्रकार उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र १५ दिवसांत लावले. मराठीबरोबरच हिंदी पत्रकारतेची सुरुवातॉदेखील कोकणातून झालेली आहे. मला मनापासून समाधान आहे की जे स्वप्न पत्रकारांसाठी बघितले ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. जमीनदेखील देण्याची संधी मिळाली. 1 कोटी 36 लाख रुपये खर्च करून ही इमारत आपण उभी करत आहोत. यामध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, निवासी सोय, सभागृह आहे. या पत्रकार भवनामधून आयएएस, आयपीएस अधिकारी घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.

वर्तमानपत्रांवर सोशल मीडियाचे आज आक्रमण झाले आहे. या सोशल मीडियाच्या माध्यामातून नवे लेखक निर्माण झाले. त्याच्या आक्रमणामुळे आत्मचिंतन करण्याची वेळ सर्वांवर आली आहे. याला आचारसंहिता कुठेतरी घालून घ्यायची आवश्यकता आहे. दिल्लीची पत्रकारिता, मुंबईची पत्रकारिता आणि रत्नागिरीची पत्रकारिता याचादेखील अभ्यास करता यावा म्हणून गेली 2 वर्षे रत्नागिरीमध्ये पत्रकारांची कार्यशाळा घेतली जाते. या पत्रकार भवनाचा वापर करत असताना बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, बाकीच्या शहरामध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये आदर्श निर्माण होईल असे कामकाज व्हायला हवे.

रत्नागिरीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पत्रकार भवनच्या जागेचा प्रश्न ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन सोडविल्यास, त्या जागेसाठीही ५ कोटी रुपये दिले जातील. त्याठिकाणीही राज्यातील एक अद्ययावत पत्रकार भवन उभे केले जाईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पत्रकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी निवासी राहून अभ्यास करण्यासाठी या पत्रकार भवनाचा निश्चित उपयोग होईल. एक वर्षाच्या आत हे पत्रकार भवन पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती खरमाळे यांनी केले. प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी सातपुते यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी पत्रकारांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. अलिमियाँ काझी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech