मुंबई महापालिका हद्दीतील वाढती अतिक्रमणे संदर्भात लक्षवेधीवरील आश्वासनाची पूर्तता तातडीने व्हावी….!

0

सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश…….

(अनंत नलावडे)
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डी,ई जी-दक्षिण,एच-पश्चिम, के-पश्चिम,पी-उत्तर, पी-दक्षिण व एल प्रभाग क्षेत्रात अनेक ठिकाणी शासकीय आणि खाजगी जमीनींवर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यासंदर्भात मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात १८ मार्च,२०२५ ला चर्चेला आलेल्या लक्षवेधीवर मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सोमवारी येथे दिले. विधानपरिषदेचे आमदार सचिन आहिर यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधीच्या अनुषंगाने आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस आ.सचिन आहिर, मनोज जामसूदकर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, नगरविकास विभागाच्या सह सचिव विद्या हम्पय्या, विधानमंडळाचे सह सचिव राजेश तारवी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणे वाढत असून याबाबत नामनिर्देशित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असतांना तसे होत नसल्याने अतिक्रमणांची संख्या वाढत आहे, असा मुद्दा आ.सचिन आहिर यांनी यावेळी उपस्थित केला. लक्षवेधीवरील चर्चेप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार यासंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती यावेळी विभागातर्फे देण्यात आली. त्यावर सभापती प्रा. शिंदे यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करुन येत्या आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे सक्त निर्देशच दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech