पश्चिम आशियात अस्थिरता; इस्रायलमधील भारतीयांसाठी भारताची अ‍ॅडव्हायजरी जारी

0

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि धोके लक्षात घेता, भारताने इराणनंतर आता इस्रायलमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅडव्हायजरी (सल्ला) जारी केली आहे. इस्रायलमधील वाढता तणाव आणि इराणमधील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा, सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने संपर्क साधता यावा यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीनुसार, इस्रायलमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी तसेच इस्रायली प्रशासन आणि होम फ्रंट कमांडकडून जारी करण्यात आलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. या अ‍ॅडव्हायजरीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी भारताच्या दूतावासाची २४x७ हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आली आहे. पश्चिम आशियात तणाव वाढलेला असताना ही सूचना जारी करण्यात आली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील राजकीय आणि लष्करी तणावाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.

एकीकडे इस्रायलसंदर्भात भारत सरकारने अ‍ॅडव्हायजरी जारी केली असताना, दुसरीकडे इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकार तयारी करत आहे. बुधवारी तेहरानमधील भारतीय दूतावासानेही नवी अ‍ॅडव्हायजरी जारी केली. या अ‍ॅडव्हायजरीमध्ये इराणमध्ये असलेल्या विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटकांसह सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध वाहतूक साधनांचा, जसे की व्यावसायिक विमानसेवा (कमर्शियल फ्लाइट्स), वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू असून, अमेरिकेने तेथे लष्करी कारवाईचा पर्याय पूर्णपणे नाकारलेला नाही. त्याचवेळी इराणने इशारा दिला आहे की, अमेरिकेने हल्ला केल्यास त्यांच्या परिसरातील अमेरिकन लष्करी तळ वैध लक्ष्य ठरतील. या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीव तसेच इस्रायलच्या दक्षिण आणि मध्य भागातील अनेक ठिकाणी सार्वजनिक आश्रयस्थळे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech