नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता अमेरिकेने उडी घतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर रविवारी(दि.२२) पहाटे हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केल्याचा काही सोशल मीडिया हँडलचा दावा भारताने रविवारी(दि.२२) “खोटा” असल्याचे म्हणत फेटाळून लावला. अमेरिकेने भारताच्या हवाई क्षेत्राचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचा सरकारकडून सांगण्यात आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला आहे की अमेरिकेने ऑपरेशन ‘मिडनाईट हॅमर’ दरम्यान इराणविरुद्ध हल्ल्यांसाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला होता. हा दावा खोटा आहे.”
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने म्हटले आहे की, “ऑपरेशन मिडनाईट हॅमर दरम्यान अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला नव्हता.” दरम्यान, अमेरिकेने रविवारी (२२ जून) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही.” याच बरोबर, “इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल,” असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.