एफ-१६ आणि जेएफ-१७ फायटर जेट पाडले
नवी दिल्ली : भारतीय सीमेत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला आज, गुरुवारी सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची २ लढाऊ विमाने पाडली आहेत. यामध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या एफ-१६आणि चीनने दिलेल्या जेएफ-१७ विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानने आज, गुरुवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, तर काही ठिकाणी ड्रोनचाही वापर करण्यात आला. राजस्थानमध्ये ७० हून अधिक क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. पाकिस्तानने जम्मू विमानतळाला लक्ष्य करून ८ क्षेपणास्त्रे डागली परंतु हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त केली. पठाणकोटवर हल्ला करण्याचा पाकिस्तानकडून अयशस्वी प्रयत्नही करण्यात आला. त्याच वेळी, पाकिस्तानने जैसलमेरमध्ये ७० क्षेपणास्त्रे सोडली परंतु सर्व क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली.
भारताने पाकिस्तानात घुसून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरला आहे. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर दहशतवादी छावण्यांवर एकाच वेळी हल्ला झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अखनूर भागात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे जेएफ-१७ विमान पायलटसह पाडले असून त्याचा शोध घेतला जातोय.