जम्मू : पाकिस्तानकडून शुक्रवारी (९ मे रोजी) रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यांना आणि गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारताने नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) जोरदार हल्ला चढवत पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे ४ लाँचपॅड नष्ट केले आहेत. याबाबत सैन्याने सोशल मिडीयात पोस्ट करत माहिती दिली. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील अनेक भागांत ८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताने निष्क्रीय केलेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी लाँच पॅडवर अचूक गोळीबार करून ते उद्ध्वस्त केले, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईचा व्हिडिओ ट्विटरवर (एक्स) शेअर करण्यात आला आहे. अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालयाने (एडीजी-पीआय) आपल्या ट्विटर पोस्टमध्ये सांगितले की, या कारवाईत दहशतवादी लाँच पॅड यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) असलेल्या या दहशतवादी लाँच पॅडचा वापर भारतीय नागरिक आणि सुरक्षा दलांविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी केला जात होता. भारतीय लष्कराने त्यावर केलेल्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट झाली असून त्यांच्या क्षमतांना मोठा धक्का बसला. दरम्यान, भारतीय लष्कराने शनिवारी पहाटे पाकिस्तानचे ड्रोन हल्ले यशस्वीरित्या रोखले. पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य फॉरवर्ड लोकेशनवर हलवणे सुरूच ठेवले आहे.