– पाकिस्तानची ८ क्षेपणास्त्रे हवेतच केली नष्ट
– जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये ब्लॅकआउट
नवी दिल्ली : पाकिस्तानने आज,गुरुवारी संध्याकाळी राजस्थान, पंजाब आणि जम्मूमध्ये अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला हाणून पाडला आहे. तसेच पाकिस्तानची ८ क्षेपणास्त्रे भारताने हवेतच नष्ट केली आहेत. दरम्यान या संपूर्ण परिसरात वीजपुरवठा खंडीत करून अंधार करण्यात आला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सातत्याने जम्मू-काश्मीरच्या पूंछ आणि राजौरीमध्ये जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा करीत असून त्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानने रात्री ८.३० वाजेनंतर जम्मू, उधमपूर, राजस्थान, पंजाबवर ड्रोन हल्ले सुरू केलेत. यासोबत पाकिस्तानकडून मिसाइल हल्ले देखील करण्यात आले.
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे जवळपास सर्वच ड्रोन पाडले असून पाकिस्तानच्या ८ मिसाईल्स हवेतच नष्ट करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान भारताच्या नागरी वस्त्यांना टार्गेट करून हल्ले करीत असून भारताकडून तडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. या धुमश्चक्रीत अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. भारताने एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले निष्प्रभ करण्यात आले आहे. जम्मू सोबतच राजस्थानचे जैसलमेर, पंजाबमध्ये पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स पाडण्यात आले आहेत. यासोबतच पाकिस्तानची लढाऊ विमाने देखील भारताने नष्ट केली आहेत. यामध्ये पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेल्या एफ-16 विमानाचा देखल समावेश आहे. दरम्यान ही विमाने नेमकी कोणत्या भागात पाडण्यात आली याचा तपशील मिळू शकलेला नाही.