नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवा बंद केल्या आहेत. आता पोस्ट आणि पार्सल हवाई किंवा जमिनीच्या मार्गाने पाठवता किंवा प्राप्त करता येणार नाहीत. यासंदर्भात आज, शनिवारी डेप्युटी डायरेक्टर जनरल लक्ष्मीकांत दश यांनी हे आदेश जारी केले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हिंदूच्या सामूहिक हत्येनंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात एकामागून एक पावले उचलत आहे. पोस्ट आणि पार्सलवर बंदी घालण्याचा निर्णय त्याच मालिकेचा एक भाग आहे. नवीन आदेशानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता टपाल (पोस्टल) आणि पार्सल सेवांना स्थगिती देण्यात आली आहे. डीडीजी लक्ष्मीकांत दश यांनी आज, शनिवारी ३ मे २०२५ रोजी हे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात टीआरएफने २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. टीआरएफ ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची शाखा आहे.
यापूर्वी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत (सीसीएस) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये, १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. यामुळे अटारी सीमेवरील तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात आला. याशिवाय, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. भारतात उपस्थित असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर बिहार येथील जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला होता. त्यानंतर ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते. पहलगाममधील दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली होती. त्यानंतर आज, शनिवारी ३ मे रोजी पंतप्रधानांनी दहशतवाद्यांच्या पोशिंद्यांचा नायनाट करण्याचा पुनरूच्चार केला आहे.