इंडिगोची १५० हून अधिक उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल

0

नवी दिल्ली : भारतातील बजेट एअरलाइन इंडीगो सध्या मोठ्या ऑपरेशनल अडचणींमधून जात आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी एअरलाइन इंडीगोने देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर अनेक उड्डाणे रद्द केल्याची माहिती आहे. याआधी मंगळवार आणि बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती, ज्यामुळे हजारो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. देशातील सर्वात मोठी एअरलाइन असलेल्या इंडीगोच्या अनेक उड्डाणांचे ऑपरेशन दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये ठप्प झाले. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीहून निघणारी ३० पेक्षा जास्त उड्डाणे इंडीगोने रद्द केली. मात्र, या मागचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. हैदराबादमध्येही सुमारे ३३ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. मुंबई विमानतळावरही अनेक उड्डाणे रद्द केली गेली.

सूत्रांच्या माहितीनुसार, इंडीगोने देशभरात आज अंदाजे १७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. इंडीगो रोज २२,००० हून अधिक उड्डाणे ऑपरेट करते. तरीही, गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होत असल्याबद्दल कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे. बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात इंडीगोने म्हटले की, “तांत्रिक अडचणी, हिवाळ्यातील हवामानामुळे शेड्यूलमध्ये झालेले बदल, खराब हवामान, एव्हिएशन सिस्टममध्ये वाढलेली गर्दी आणि फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन्स यांमुळे आमच्या ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला असून आम्हाला अनेक उड्डाणे रद्द करावी लागत आहेत.” एअरलाइन कंपनीने पुढे सांगितले की, “अडथळे कमी करण्यासाठी आणि स्थिरता परत आणण्यासाठी आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये थोडेसे बदल करण्यास सुरुवात केली आहे. हे उपाय पुढील 48 तास लागू राहतील आणि यामुळे आमची ऑपरेशन्स सामान्य स्थितीत आणण्यास मदत होईल तसेच संपूर्ण नेटवर्कमध्ये आमची वेळेवर सेवा (पंक्चुअॅलिटी) पुन्हा मिळवता येईल.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech