कोची : भारतीय नौदलाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या भारतीय महासागरी जहाज सागर या उपक्रमात नऊ आयओआर (हिंद महासागर क्षेत्रातील देश) नौदलांतील कर्मचारी सहभागी झाले होते. आग्नेय आयओएस क्षेत्रातील महिन्याभराच्या तैनातीच्या समाप्तीनंतर हे जहाज 08 मे 2025 रोजी कोची येथे परतले. कोची येथील नौदल तळावर झालेल्या भव्य स्वागत समारंभात दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल व्ही श्रीनिवास यांनी भारतीय कर्मचारी तसेच नऊ मित्रदेशांच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तैनातीच्या यशस्वी सांगतेमुळे सागरी सहकार्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला असून सामुहिक सागरी हिताचे संरक्षण, क्षमता निर्मिती तसेच आयओआर देशांशी असलेली कायमस्वरूपी भागीदारी यांच्याप्रती भारताची कटिबद्धता यातून अधोरेखित होत आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथून ५ एप्रिल रोजी आयओएस सागर या जहाजाला रवाना केले होते. तैनातीदरम्यान या जहाजाने दार-ईसलाम, नकाला, पोर्ट लुईस,पोर्ट व्हिक्टोरिया तसेच माले या बंदरांना भेट दिली. संयुक्त नौदल सराव, व्यावसायिक तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच टांझानिया, मोझांबिक, मॉरीशस आणि सेशेल्स या महत्त्वपूर्ण देशांमध्ये संयुक्त ईईझेड टेहळणी हे या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचे घटक होते.
कोमोरोस, केनिया,मादागास्कर,मालदीव्ज,मॉरीशस, मोझांबिक, टांझानिया, सेशेल्स आणि श्रीलंका या नऊ भागीदार देशांच्या 44 आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत अनोखा अनुभव ठरला कारण या सर्वांनी भारतीय नौदल कर्मचाऱ्यांसह संयुक्तपणे या जहाजावर काम करून, ‘एक महासागर, एक मोहीम’ या संकल्पनेचा खरा अर्थ दाखवून दिला. दिनांक 25 मार्च रोजी कोची येथे एसएनसीमध्ये बंदरसंबंधित आणि सागरी प्रशिक्षण अशा संयुक्त टप्प्यासह सुरु झालेला आयओएस सागर या जहाजाचा प्रवास सर्व कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कर्मचाऱ्यांचे एका उत्तम प्रकारची वीण असलेल्या आणि एकसंघ पथकाच्या स्वरूपातील अशा प्रकारचे व्यावसायिक आणि सुरळीत एकत्रीकरण सौहार्द आणि सागरी मैत्रीच्या उर्जेचे दर्शन घडवते. ही मोहीम म्हणजे भारत सरकारची महासागर (प्रदेशातील सुरक्षिततेसाठी परस्पर आणि समग्र आघाडी) ही धोरणात्मक संकल्पना साकार करण्यासाठी आयओआर मध्ये ‘सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश’ आणि ‘प्राधान्यक्रम असलेला संरक्षण भागीदार’ असण्याप्रती भारतीय नौदलाच्या कटिबद्धतेचा पुरावाच आहे.