नवी दिल्ली : मुलांच्या सुरक्षेबाबत सीबीएसईने एक मोठे पाऊल उचलले आहे. सीबीएसई बोर्डाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून प्रत्येक मुलावर लक्ष ठेवता येईल. आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. हा नवीन नियम प्रत्येक शाळेला लागू होईल जो मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात मैलाचा दगड ठरू शकणार आहे.
शाळांमध्ये सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीबीएसईने ऑडिओ-व्हिज्युअल सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे शाळेचे गेट, वर्गखोल्या, कॉरिडॉर, पायऱ्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, कॅन्टीन, स्टोअर रूम आणि खेळाचे मैदान अशा प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बसवले जातील. पण मुलांची गोपनीयता लक्षात घेऊनशौचालये आणि वॉशरूम च्या ठिकाणी बसवण्यात येणार नाहीत. यामुळे शाळेत होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल आणि कोणत्याही अनुचित घटनेला वेळेत रोखता येईल.
फक्त कॅमेरे बसवणे पुरेसे नाही. सीबीएसईने या कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग किमान १५ दिवस सुरक्षित ठेवण्याचीही खात्री केली आहे. याचा अर्थ असा की, जर कोणतीही घटना घडली तर अधिकारी त्याची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ फुटेज पाहू शकतील. यामुळे मुलांची सुरक्षितता आणखी मजबूत होईल. कारण प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचा रेकॉर्ड उपस्थित राहील. हे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही शाळा व्यवस्थापनावर सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच एनसीपीसीआर म्हणते की, मुलांना केवळ शारीरिक सुरक्षिततेचीच नव्हे तर मानसिक, भावनिक आणि सामाजिक सुरक्षिततेची देखील आवश्यकता आहे. मुलांना सुरक्षित आणि आधार देणारे वातावरण प्रदान करणे ही शाळेतील प्रत्येक शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. या नियमामुळे शाळेत होणाऱ्या कोणत्याही चुकीच्या कृत्यांना आळा बसेल. आणि पालकांनाही खात्री राहील की, त्यांची मुले शाळेत सुरक्षित आहे.