जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; तापमानाने ओलांडली चाळीशी

0

जळगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा झपाट्याने वाढू लागला असून ९ मार्च रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला. काही भागात कमाल तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, फैजपूर, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा आणि वरणगाव येथे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. जळगाव, बोदवड, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल आणि रावेर या ठिकाणी तापमान ४०.५ अंशांपर्यंत पोहोचले. भडगाव, पारोळा आणि यावल येथे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर धरणगाव येथे ३९.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.

सकाळपासूनच सूर्याची कडाक्याची तीव्रता जाणवत होती. दुपारच्या सुमारास उष्णतेची लाट अधिकच तीव्र झाल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. शेतकरी, कामगार आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना मात्र या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे थंड पेये, लिंबूपाणी, उसाचा रस आणि फळांच्या रसांना मोठी मागणी वाढली आहे.

शहरातील बाजारपेठांमध्ये दुपारच्या वेळी तुलनेने कमी गर्दी दिसून येत आहे. हवामान तज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची तीव्रता कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापडाचा वापर करणे अशा उपाययोजना करून उष्माघातापासून बचाव करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech