वर्षभरात इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस – मुख्यमंत्री

0

मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल, उपमुख्यमंत्री आणि अन्य नेते, अनुयायी यांनी अभिवादन केले. त्याप्रसंगी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. सध्या स्मारकाचे ५० टक्के काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि ३५० फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे सुरु असून, बाहेरील विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे स्मारक खुले होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. १०० फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर ३५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम सुरू आहे तर पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरु असून पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech