इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचे मानले आभार

0

जेरुसलेम : इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. इस्रायलने मदत मागितल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेने ताकदीने काम केले आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हाच खरा मार्ग आहे, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. “अमेरिका खरोखरच अद्वितीय आहे. त्यांनी असं काही केलं आहे जे पृथ्वीवरील इतर कोणताही देश करू शकत नाही. इतिहासात नोंद आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवट, जगातील सर्वात धोकादायक शस्त्रे संपवण्याचे काम केले,” असं नेतन्याहू यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो की,’शांतता शक्तीतून येते. आधी ताकद दाखवली जाते, नंतर शांतता येते,’ आज रात्री, ट्रम्प आणि अमेरिकेने पूर्ण ताकदीने त्यांचे काम केले आहे,” असं म्हणत नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लष्करी कारवाईबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले. अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकन सैन्याने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला असून सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचल्याचे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी कारवाईबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आनंद व्यक्त करत सैनिकांचे अभिनंदन केले. “लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकन सैन्य सुरक्षितपणे अमेरिकेत परतत आहे. आपल्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं ट्रम्प यांनी म्हटलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech