मुंबई : कुर्ला टू वेंगुर्ला… हा चित्रपट प्रत्येक कोकणी माणसाने पाहिला पाहिजे आणि इतरांना पाहायला सांगितले पाहिजे….कारण… १) या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा कोकणचा अमर्याद निसर्ग दोन तास आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहता येतो, याचे संपूर्ण चित्रीकरण वेंगुर्ला आणि सिंधुदुर्गात झाले आहे २) हा संपूर्ण चित्रपट आपल्या सर्वांची आवडती भाषा मालवणी भाषा यामध्ये झाला आहे. पहिल्यांदा संपूर्ण चित्रपट मालवणी भाषेत झालाय. ३) कोकणच्या प्रमुख समस्येला हा चित्रपट हात घालतो, पण कुठेही प्रबोधन नाही अतिशय गंभीर विषय हसत हसत आपल्याला सर्वांना अंतर्मुख करतो ४) आपण सिनेमा रसिक असाल तर हा चित्रपट आपल्याला प्रचंड आनंद देईल खूप वर्षांनी असे चित्रपट जो सर्व कुटुंबाला सोबत घेऊन पहावा, प्रदूषण नसलेले कोकण आणि प्रदूषण नसलेला चित्रपट आपल्याला या निमित्ताने पाहता येतो ५) गावाकडे चला असे सांगणारा आणि कोकणातील मुंबई पुणेकर चाकरमानी यांची मानसिकता बदलणारा अतिशय प्रभावी चित्रपट, ६) मुंबईचा नवरा आणि जावई पाहिजे आणि प्रत्येकाला मुंबई पुण्यात जायचं आहे ही वर्षानुवर्ष कोकणची मानसिकता बदलण्यासाठी मनोरंजनातून प्रभावी प्रबोधन करणारा कोकणच्या मातीतला चित्रपट ७) आपलं कोकण किती सुंदर आहे हे जगासमोर आणणारा देखणा चित्रपटअशी असंख्य कारणे आहेत.
ज्यामुळे हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने शाळेतील विद्यार्थ्याने, कोकणातील आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलींनी, गावात जाऊन काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या कोकणवासीयाने आणि त्याला मदत किंवा विरोध करणाऱ्या त्याच्या पत्नीने सर्वांनी हा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये पाहिला पाहिजे. आणि आपल्या मित्र मंडळींनी तो पहावा असा आग्रह धरला पाहिजे. सिनेमा प्रेमींसाठी आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ही भविष्यामध्ये हिंदी पेक्षा मोठी झाली पाहिजे, सखुबाई, गंगाराम, शांताबाई, गणपत अशा नोकर मानसिकतेतून मराठी सिनेमा बाहेर यायला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा, शंभुराजेंचा, टिळक आंबेडकरांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आणि त्याची सिनेसृष्टी ही अतिशय दर्जेदार प्रभावी तामिळ आणि दक्षिणात्य सिनेसृष्टी सारखी विकसित व्हायला हवी यासाठी मराठी प्रेक्षकांनी चांगले मराठीचे चित्रपट भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. यासाठी दशावतार आणि कुर्ला टू वेंगुरला हे दोन्ही चित्रपट प्रचंड चालायला हवेत.
सिनेमा या विषयासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे अमरजीत आमले हे सिनेमाचे कार्यकर्ते गेली २५ वर्ष मुलांना शिकवत आहे आणि अनेक मुलांना या क्षेत्रात त्यांनी करिअर करण्यासाठी उद्योग केले आहे त्यांच्या विद्यार्थ्यांनी लोक वर्गणी काढून बनवलेला हा चित्रपट म्हणजे सिनेमाची लोक चळवळ आणि कोकण विकासाची लोक चळवळ म्हणूनच सिने कथा कीर्तन आणि ग्लोबल कोकण एकत्र येऊन हा चित्रपट लोकांना समर्पित करत आहेत. गेली २५ वर्ष आपण कोकण चाकरमान्याना सांगत आहोत गावाकडे परत चला, कोकणातील तरुणांनी विद्यार्थ्यांनी गावात राहिले पाहिजे, जमिनी विकू नका त्या विकसित करा कोकण हा जगातला सगळ्यात सुंदर प्रदेश आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व मनोरंजनातून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहे आणि म्हणूनच आपण सर्व शक्तीनिशी या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये सहभागी झालो आहोत.
सर्वप्रथम तुम्ही हा चित्रपट सहपरिवार मित्रांसह थिएटरमध्ये पहा आणि आवडला तर कोकणातील प्रत्येक ग्रामस्थ मंडळ, प्रमुख संस्था, संवेदनशील उद्योजक यांनी या चित्रपटाचे शो आयोजित करा एकत्रित बसून कार्यकर्त्यांनी हा चित्रपट पहा, निश्चितच कोकण विकासाला दिशा आणि गती देणारा हा चित्रपट प्रचंड यशस्वी व्हावा ही सर्वप्रथम जबाबदारी मालवणी कोकणी सिंधुदुर्ग मधल्या तरुणांची आहे आणि त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्या.