– ६ मार्चला सादर होणार अर्थसंकल्प
मुंबई : राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली. हे अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, रविवार आणि सण मिळून चार आठवड्यांच्या अधिवेशनात एकूण ११ सुट्ट्या असणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी शोक प्रस्ताव मांडले जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, अध्यादेश पटलावर ठेवणे, शासकीय कामकाज, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेचा पहिला दिवस, सत्तारुढ पक्षाचा प्रस्ताव अशा कामाने सुरुवात होईल. पुढील कामकाजात सन २०२५-२०२६ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. त्यानंतर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल, तर २६ व २७ फेब्रुवारीला पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होऊन २७ फेब्रुवारीला पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल.
शुक्रवार, ६ मार्च रोजी सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यानंतर पुढील दिवसांत अर्थसंकल्पावर चर्चा होईल आणि अर्थसंकल्पीय मागण्या मतदानाला टाकल्या जातील. मंगळवार, २४ मार्च रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाईल. बुधवार, २५ मार्च रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल. या कालावधीत एकूण ११ दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार नसून त्या दिवशी सुट्टी असणार आहे. यामध्ये मंगळवार, ३ मार्च रोजी होळी (दुसरा दिवस), गुरुवार, १९ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या नियोजित वेळापत्रकात कामकाजाच्या गरजेनुसार फेरफार होऊ शकतो, असे विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.