नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी ‘स्व-गणने’ची प्रक्रिया पूर्ण करून जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना बिर्ला म्हणाले, की ही राष्ट्रीय जनगणना प्रशासकीय कारभारातील एका नव्या युगाची सुरुवात आहे.भारताच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण जनगणना प्रक्रिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर राबवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या बदलामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवण्याचा अधिकार आणि सुविधा प्राप्त झाली आहे.ही संपूर्ण प्रक्रिया “अत्यंत सुरक्षित,अचूक आणि वापरकर्त्यांसाठी सुलभ” असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
डिजिटल जनगणनेकडे होणारे हे स्थित्यंतर भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीचे प्रतीक असून, यामुळे राष्ट्रीय डेटा अधिक अचूक आणि वास्तववादी असेल,असेही बिर्ला यांनी नमूद केले. ‘जनगणनेतून जनकल्याण’ हा संकल्प अधोरेखित करत, लोकसभा अध्यक्षांनी सर्व नागरिकांना या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रक्रियेत हिरिरीने सहभागी होण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपली माहिती स्वतः नोंदवावी आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून ‘सशक्त आणि समृद्ध भारता’चा पाया रचण्यास मदत होईल,असे त्यांनी सांगितले. या स्व-गणना प्रक्रियेदरम्यान भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी उपस्थित होते.