भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक – मुख्यमंत्री

0

मुंबई : ज्ञान, साधना, सुरक्षा आणि कृषी याबाबत महत्वपूर्ण विचारांदवारे साहित्य, कला, संस्कृती आणि सभ्यता प्रगल्भ करणारा “असी, मसी और कृषी” चा जीवनमार्ग भगवान वृषभदेव यांनी दाखविला. जगाच्या कल्याणासाठी हे विचार व ज्ञान येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ऋषभदेवांचे विचार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बोरिवली येथे ऋषभायन – २ या तीन दिवसीय वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, माजी खासदार गोपाळ शेट्टी, एल.पी. सिंह, ललित गांधी तसेच जैन मुनी, शिख, बौध्द आणि हिंदू धर्मगुरू देखील यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिले तीर्थंकर, पहिले सम्राट, भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतिक भगवान ऋषभदेव आहेत. जगाला ‘संस्कृती’ या संकल्पनेची ओळखही नसताना भारत पूर्ण विकसित सांस्कृतिक अवस्थेत होता, भगवान ऋषभदेव यांनी देशाच्या संस्कृतीसाठी महत्वाचे योगदान दिलेले आहे. मानवजातीला जीवनाचा मार्ग, साहित्य, कला, संस्कृती, अध्यात्म, ज्ञान, शेती, सुरक्षा, प्रेम, आनंद आणि अनंततेची संकल्पना दिली. ऋषभदेव केवळ एका धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर त्यांनी मानवी संस्कृतीचा पाया रचला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भगवान ऋषभदेवांनी पुरुषांसाठी ७२ कला आणि महिलांसाठी ६४ कलांचे विवेचन केले असून, वास्तुकला, धातुकाम, उत्पादन असे ते होते. वैविध्यपूर्ण जीवनपद्धतींचे त्या कलांचे पुनरुज्जीवन व संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून घडत आहे. देश, संस्कृती, अभिमान आणि स्वाभिमान यांसाठी हे कार्य अद्वितीय व अत्यंत मोलाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी जैन, बौद्ध, सनातन, शीख आदी विविध परंपरांचे वाहक एकत्र आले असून, सर्वांनी एकत्रितपणे भगवान ऋषभदेवांच्या विचारांना वंदन केले. सर्व संत, ऋषी, महंत, साध्वी आणि भिक्षू यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती ही भारतीय ज्ञान प्रणाली भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः जैन संतांनी ध्यान, साधना आणि लोककल्याणाच्या भावनेतून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले असून, ते मानवतेसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. भगवान ऋषभदेवांचे विचार जगासमोर मांडण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार भगवान ऋषभदेवांसाठी एक जागतिक दर्जाचे, योग्य व समर्पित स्थान निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात येईल आणि त्यांनी दिलेले ज्ञान, कला, आणि सांस्कृतिक मूल्ये एकत्रितपणे जगासमोर मांडण्यासाठी शासनाच्या वतीने जागा देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जैन मुनी यांनी या कार्यासाठी येथे जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली होती.

‘वृषभ कला’ प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन : ‘वृषभ कला’ या दालन व प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘भारतीय संस्कृती चे पुरोधा राजा भगवान ऋषभ यांच्या वरील कला दालनाद्वारे ऋषभदेव यांनी केलेल्या कार्याचा त्यांच्या विचारांचा परिचय दिला जात आहे. ऋषभायन-२ या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्ताने ‘ऋषभयन’ या संकल्पनेतून साकार झालेल्या ११११ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. हे सर्व ग्रंथ सखोल संशोधनावर आधारित असून त्यांची संख्या १,४०० पर्यंत पोहोचणार आहे. यावेळी भगवान ऋषभ यांच्या जीवनावर आधारित पुस्तिका तयार करण्यात आली असून, ती येत्या दोन-तीन दिवसांत सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत वितरित केली जाणार आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech