मुंबई : महाराष्ट्रातील आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ इतका अत्यंत मर्यादित असून, या कालावधीत सुट्ट्यांचे दिवस आल्याने प्रत्यक्ष कार्यदिवस खूपच कमी असल्याची बाब समोर आली आहे.
नामनिर्देशन अर्ज हा अत्यंत महत्त्वाचा, तांत्रिक व कायदेशीर स्वरूपाचा असल्याने त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, नियमांनुसार तपासणी व अंतिम सादरीकरणासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. मात्र कमी कालावधीमुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनावधानाने त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याचा थेट परिणाम उमेदवारांच्या लोकशाही हक्कांवर होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता, न्याय्यता व निष्पक्षता अबाधित ठेवण्यासाठी नामनिर्देशन अर्ज सादरीकरण व तपासणीसाठी किमान एक सुट्टीचा दिवसही खुला ठेवावा.
सर्व इच्छुक उमेदवारांना समान व पुरेशी संधी मिळावी, तसेच तांत्रिक कारणांमुळे कोणाचाही अर्ज बाद होऊ नये, यासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.