जिल्हा परिषदेतही महायुतीच !

0

– नितीन सावंत

नगरपरिषद प्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडीने पराभूत मनोवृत्तीत लडवल्याने अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला यश मिळाले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले, ज्यात महायुतीने (भाजप, शिंदे सेना, अजित पवार राष्ट्रवादी) स्पष्ट विजय मिळवला. विरोधी महाविकास आघाडी (काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी) मात्र पराभूत झाली .७३१ जिल्हा परिषद जागांपैकी महायुतीने ५६२ जागा जिंकल्या, ज्यात भाजपला २३३, अजित पवार राष्ट्रवादीला १६७ आणि शिंदे शिवसेनेला १६२ जागा मिळाल्या.

महाविकास आघाडीला फक्त १२५ जागा मिळाल्या, ज्यात काँग्रेस ५६, उद्धवसेना ४३ आणि शरद पवार राष्ट्रवादीला २६ जागा. पंचायत समितीच्या १४६२ जागांमध्येही महायुतीने १००० हून अधिक जागा घेतल्या. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने बाजी मारली आहे ती खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांच्या मेहनतीमुळे. विशेष म्हणजे नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणे यांनी शांत राहून आणि डॉ. निलेश राणे यांनी मैदानात उतरून भाजपला धडा शिकवल्यामुळे यावेळी मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी शहाणपणा दाखवला. खासदार नारायण राणे आणि शिवसेना आमदार डॉ. निलेश राणे यांच्याशी व्यवस्थित जागावाटप केल्याने सिंधुदुर्गात निर्विवाद भाजपची सत्ता आली. नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपच्य आहारी गेलेले मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यावेळी मात्र ताळ्यावर आले. यावेळी मात्र मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना राणे ब्रँड आठवला. सिंधुदुर्गातील विजय हा राणे ब्रँडचा विजय आहे अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या नाराज वडिलांना खुश केले आहे.

रत्नागिरीमध्ये शिंदे सेनेने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. ५६ पैकी एकेचाळीस जागांवर विजय मिळवून रत्नागिरीतील जनता ही उद्धव ठाकरे सेनेच्या नव्हे तर शिंदे सेनेच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. उद्योग मंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार त्यांचे बंधू भैय्या सामंत आणि खेड दापोली मध्ये शिवसेना नेत रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आपले गट राखण्यात यशस्वी झाले. या तिघांमुळेच शिंदे सेना ४१ जागा पर्यंत मजल मारू शकली. ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव हे गुहागर पुढे मजल मारू शकलेले नाहीत.

रायगड मध्ये भरत शेठ गोगावले आणि शिंदे सेनेच्या सर्व आमदारांनी सुनील तटकरे यांच्याशी दोन हात करत येथील निवडणुका लढवल्या होत्या. शिंदे सेनेने रायगड मध्ये २१ जागांवर मजल मारली आहे. मात्र तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त १६जागा मिळवले आहेत. भाजपने शेकाप मधील नेत्यांना यापूर्वीच आपलेसे केले होते त्यामुळे त्यांची मतं मजल १५  पर्यंत गेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे रायगड मधील वर्चस्व संपुष्टात आले आहे. भाई जयंत पाटील यांनी आता रायगड मध्ये शेकाप औषधालाही शिल्लक ठेवलेला नाही. यापूर्वी एकसंघ शिवसेनेने जयंत पाटील यांच्या शेकापशी दोन हात केले होते. आता शिंदे सेनेतील आमदारानी आणि भाजपने मिळून शेकापचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरानंतर मराठवाड्यात शिवसेनेने आपले पाय घट्ट केले होते. येथील संघटना ही मजबूत होती. परंतु शिवसेनेच्या फुटी नंतर मराठवाड्यातील हा सर्व असंतुष्ट वर्ग शिंदे सेनेने आपलासा केला आहे. त्यामुळे मराठवाड्यात शिंदे सेनेला भाजपच्या खालोखाल यश मिळाले.

पुण्यात अजितदादांच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. पुणे जिल्ह्यातील जनतेने अजित दादांच्या राष्ट्रवादीला भरभरून यश दिले. मात्र साताऱ्यात शंभूराजांना रोखण्यात शिवेंद्र राजे यशस्वी झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्याची जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आणण्यास यश मिळवले. शिंदे सेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी फार मोठी हवा केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे मुळगाव सातारा जिल्ह्यात येत असल्याने आपण ही जिल्हा परिषद सह जाणू सहज निवडून आणू, असा शंभूराजे यांना विश्वास होता परंतु शिवेंद्र राजे यांनी यांनी त्यांच्यावर मात केली.

सांगलीमध्ये अटीतटीची लढाई आहे.महाविकास आघाडीकडे ३१ सदस्य आहेत तर महायुतीकडे ३० सदस्य आहेत त्यामुळे अद्यापही हे जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात जाणार हे कुणीही सांगू शकत नाही. येथे जयंत पाटील यांनी आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे. कोल्हापूरमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

– नितीन सावंत,
9820355612

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech