मुंबईतील प्रमुख रुग्णालयांचा ‘कायापालट’ होणार; सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी सरकार ‘ॲक्शन मोड’मध्ये!

0

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयांमधील कचरा व्यवस्थापनाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये जैववैद्यकीय (Biomedical) कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर होणारी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवली जात असल्याची महत्त्वाची माहिती राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयातील कचरा केवळ फेकण्याऐवजी त्याचे योग्य ‘सेग्रिगेशन’ करून विल्हेवाट लावण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

केवळ कचराच नव्हे, तर सांडपाणी व्यवस्थापनाबाबतही सरकार आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मुंबईतील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक आणि पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली (STP/ETP) उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प नेमके कुठे आणि कसे उभारता येतील, याचे सर्वेक्षण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल हाती येताच मुंबईतील रुग्णालयांचा कायापालट करणारा मोठा निर्णय घेतला जाईल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. यामुळे आगामी काळात मुंबईतील आरोग्य व्यवस्था अधिक ‘ग्रीन’ आणि सुरक्षित होण्याची चिन्हे आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech