नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रतिष्ठित वृत्तपत्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या द वॉशिंग्टन पोस्टमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली. या निर्णयाचा वृत्तपत्राच्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग टीम, क्रीडा विभाग (स्पोर्ट्स डेस्क) तसेच इतर अनेक विभागांवर गंभीर परिणाम झाला आहे. कपातीनंतर अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकारांनी सोशल मीडियावर आपली व्यथा व्यक्त केली. यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे पुत्र ईशान थरूर यांचाही समावेश आहे.
ईशान दीर्घकाळापासून वॉशिंग्टन पोस्टशी जोडलेले होते. नोकरी गमावल्यावर ईशान थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपले दुःख व्यक्त करत लिहिले की नोकरीवरून काढून टाकले जाणे अत्यंत वेदनादायक आहे. गेल्या १२ वर्षांत ज्यांच्यासोबत त्यांनी काम केले, त्या आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि संपादकांपासून वेगळे होणे मनाला फार लागले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०१७ मध्ये सुरू झालेला त्यांचा ‘वर्ल्ड व्ह्यू’ हा स्तंभ त्यांच्या कारकिर्दीतील एक सन्मानास्पद भाग होता, आणि तो लाखो वाचकांनी वाचला, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या कपातीचा सर्वात मोठा फटका वॉशिंग्टन पोस्टच्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग टीमला बसला आहे. पश्चिम आशियाची संपूर्ण टीम बरखास्त करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, बीजिंग, कीव, लॅटिन अमेरिका आणि बर्लिन येथील महत्त्वाची ब्युरो कार्यालये बंद करण्यात आली आहेत किंवा ती मोठ्या प्रमाणात लहान केली गेली आहेत. या कपातीचा फटका युद्धक्षेत्रात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांनाही बसला आहे. याशिवाय वॉशिंग्टन पोस्टने आपला स्पोर्ट्स डेस्कही बंद केला आहे.वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने मात्र सांगितले की हा निर्णय मोठ्या पुनर्रचनेचा भाग आहे.