मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

0

मुंबई : मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्ब्ल १७ वर्षांनी आज, गुरुवारी लागण्याची शक्यता होती.१९ एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल के लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता. यानंतर आज पार पडलेल्या सुनावणीत या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. १ लाख पेक्षा जास्त आरोपपत्र पान असल्याने वेळ लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३१ जुलै रोजी होणार आहे.

एनआयएने दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून वेळ मागितला होता. त्यानुसार हा वेळ देण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीसाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी उपस्थित होते. पुढच्या वेळी निकाल नक्की लागेल. सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो आणि होईल, असा विश्वासही प्रज्ञासिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाबाबत न्यायालयाची सुनावणी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे केवळ निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र आता हा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे.

मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०१ जण जखमी झाले होते. मालेगाव स्फोट खटल्याचा प्राथमिक तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकानं ११ जणांना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं होतं.हे सर्वजण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित असून त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी काही तरुणांना भोसला मिलिट्री स्कूलमध्ये शस्त्र आणि स्फोटकांचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप एटीएसनं केला होता. यात ज्या एलएमएल फ्रिडम मोटरसायकलवर हा बॉम्ब लावला होता, त्याची मालकी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना एटीएसने अटक केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech