“मन की बात”मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

0

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना पुन्हा एकदा अफवांकडे दुर्लक्ष करून एकता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हा मार्च महिना जागतिक पातळीवर खूपच उलथापालथींचा होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, की भूतकाळात कोविडमुळे साऱ्या जगाला दीर्घकाळ अनेक अडचणींमधून जावं लागलं.

आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा होती की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर जग नव्या दमानं प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहील. पण जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती उत्पन्न होत राहिली. सध्या आपल्या शेजारी एक महिन्यापासून भीषण युद्ध चालू आहे. आपल्या लक्षावधी कुटुंबांचे सगे-सोयरे या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. अशा एक कोटींहून अधिक भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याबद्दल, मी आखाती देशांना विशेष धन्यवाद देतो.

ज्या भागात आत्ता युद्ध चालू आहे, तो भाग आपल्या ऊर्जा- गरजा भागवणारं खूप मोठं केंद्र आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेला सहयोग, आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य, यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत आहे.

हा निश्चितच आह्वानात्मक काळ आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी आज सर्व देशवासीयांना पुन्हा एकदा आग्रह करेन, की आपल्याला एकजुटीनं या आह्वानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं आहे. जे लोक याही बाबतीत राजकारण करत आहेत, त्यांनी राजकारण करू नये. हा देशाच्या १४० कोटी देशवासीयांच्या हिताशी संबंधित विषय आहे, आणि यामध्ये स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाला अजिबात थारा नाही. अशा स्थितीत जे लोक अफवा पसरवत आहेत, ते देशाचं खूप मोठं नुकसान करत आहेत.

मी सर्व देशवासीयांना आवाहन करेन की त्यांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये. सरकारकडून आपल्याला सातत्याने जी माहिती दिली जात आहे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिच्यावरच विश्वास ठेवून कोणतंही पाऊल उचला. मला दर वेळेप्रमाणेच याही वेळी खात्री आहे, की जसा आपल्या देशाने १४० कोटी देशवासीयांच्या सामर्थ्यावर जुन्या संकटांचा पाडाव केला होता, तसं यावेळीही आपण सर्व मिळून या अवघड परिस्थितीतून अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडू.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशाच्या हस्तलिखित वारशाच्या जतनकार्यात जनतेच्या सहभागाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ‘ज्ञान भारतम’ उपक्रमांतर्गत हस्तलिखिते जतन केली जात आहेत आणि त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. या उद्देशासाठी एक ॲपदेखील विकसित करण्यात आले आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जतन केलेल्या हस्तलिखितांविषयी माहिती देण्याचे आवाहन केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech