जयपूर : जोधपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एका खासगी बसच्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्ज आढळल्याने खळबळ उडाली आहे. मथानिया मिरचीच्या नावाखाली ही तस्करी करण्यात येत होती. मिरचीला मधोमध फाडून त्यात चांदीच्या फॉइलमध्ये ड्रग्ज पुड्या भरल्या गेल्या होत्या. या प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करत आहे. २८ जानेवारी रोजी जोधपूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये एका व्यक्तीने मिरचीचे पार्सल पाठवले होते. बस हैदराबादला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरला पार्सल संशयास्पद वाटले. त्याने मिरची कापून पाहिली असता आत फॉइल पेपरमध्ये एमडी ड्रग्ज आणि स्नॅक्सचे छोटे तुकडे आढळले. ड्रायव्हरने याचा व्हिडिओही तयार केला.
दरम्यान, एक व्यक्ती ते पार्सल घेण्यासाठी आला. ड्रायव्हरने त्याला मिरचीत ड्रग्ज असल्याचे सांगितले असता त्याने धमकावून, पार्सल आणण्यासाठी पैसे मिळाले आहेत असे सांगत ते घेऊन पलायन केले. यानंतर ड्रायव्हरने हैदराबाद पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणानंतर जोधपूर एनसीबीचे संचालक घनश्याम सोनी यांनी मिरचीमध्ये ड्रग्ज तस्करीचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा कोणत्याही संशयास्पद प्रकाराची माहिती तात्काळ एनसीबीच्या हेल्पलाइनवर किंवा इतर संबंधित एजन्सींना द्यावी. समाजाला व्यसनापासून वाचवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.