मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर / विशेष प्रतिनिधी
सभागृहात एखादा प्रश्न उचलत असताना लोकप्रतिनिधीला धमकी येणे हा विशेषाधिकाराचा भंग आहे. तसेच अशी धमकी म्हणजे या सभागृहाच्या अधिकारावर अधिक्षेप असल्याचे सांगत आमदार कृष्णा खोपडे यांना मोबाईलवर देण्यात आलेल्या धमकीशी कोण संबंधित आहे आणि ते कुणासाठी काम करतात याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तसेच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या बाकी कारभाराच्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक निवेदन सभागृहात केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आज विधानसभेत शून्य प्रहरात भाजपचे नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांना मोबाईलवर मिळालेल्या धमकीची माहिती दिली. मुंढे २०२० मध्ये नागपूर महापालिकेत आले. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकार नसतानाही त्यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे धनादेश अदा केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पुराव्यासह एफआयआर दाखल झाला आहे. स्मार्ट सिटीशी संबंधित दोन महिला अधिकाऱ्यांना त्यांनी त्रास दिला आहे. याविषयी आपण लक्षवेधी सूचना दिली आहे. त्यावर मला माझ्या दोन्ही मोबाईलवर धमकी देण्यात आली. तुम्ही तुकाराम मुंडेंच्या विरोधात बोलू नका. नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल, अशी धमकी दिल्याचे खोपडे यांनी सांगितले.
तसेच भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनीही मुंढे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर लावला. मुंढे यांच्या विरोधात दाखल असलेला एफआयआर अजूनही प्रलंबित आहे. मुंढे यांनी पाच दिवसाची बाळंतीण असलेल्या महिला अधिकाऱ्याची सुट्टी रद्द केली. दुसऱ्या एका महिला अधिकाऱ्याने फाईलवर सही केली नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला. याप्रकरणी मुंढे यांची महिला आयोगाकडे तक्रार झाली आहे. त्यामुळे आमदार खोपडे यांना जर मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे, हा चौकशीचा विषय आहे. आम्ही काही न्यायालय किंवा न्यायाधीश नाही. पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील त्याची चौकशी व्हायला पाहिजे, असे दटके म्हणाले.
कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
दरम्यान, या चर्चेपूर्वी कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांचे नाव घेऊन आपल्याला देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी सरकारला निवेदन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. या मागणीला भाजपच्या आमदारांनी पाठिंबा दिला. मात्र,पीठासीन अधिकारी असलेले उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी याबाबत कोणतेही निर्देश न दिल्याने संतप्त झालेल्या भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने बनसोडे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.