इंडिगोला सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाचे निर्देश

0

नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रवाशांचे तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया रविवार, ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला आहे, त्यांच्यासाठी कोणतेही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये, असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब केल्यास किंवा अनुपालन न केल्यास त्वरित नियामक कारवाई केली जाईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

तक्रारींचे निवारण सुलभ व्हावे यासाठी समर्पित प्रवासी सहाय्य आणि रकमेच्या परतफेडीसाठी सुविधा कक्ष स्थापन करण्याचे निर्देश इंडिगोला देण्यात आले आहेत. या कक्षांना बाधित प्रवाशांशी सक्रियपणे संपर्क साधण्याचे तसेच अनेक पाठपुराव्याशिवाय परतफेड आणि पर्यायी प्रवास व्यवस्था होईल याची खात्री करण्याचे काम देण्यात आले आहे. उड्डाणांचे वेळापत्रक पूर्णपणे स्थिर होईपर्यंत स्वयंचलित परताव्यांची प्रणाली सक्रिय राहील. मंत्रालयाने इंडिगोला उड्डाण रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे प्रवाशांपासून दूर गेलेले सर्व बॅगेज शोधून प्रवाशांच्या निवासस्थानी किंवा त्यांनी निवडलेल्या पत्त्यावर पुढील ४८  तासांच्या आत पोहोचवले जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रॅकिंग आणि डिलिव्हरीच्या वेळेबाबत प्रवाशांशी स्पष्ट संवाद राखण्यास आणि विद्यमान प्रवासी हक्क नियमांनुसार आवश्यक असल्यास भरपाई देण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.

या व्यत्ययाच्या काळात प्रवाशांचे हक्क पूर्णपणे संरक्षित केले जातील, याची खात्री करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय विमान कंपन्या, विमानतळ, सुरक्षा संस्था आणि परिचालन संबंधित सर्व हितधारकांसोबत सातत्याने समन्वय साधत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि तातडीच्या प्रवासाची आवश्यकता असलेल्या सर्वांसाठी योग्य सुविधा सुनिश्चित करण्यासाठी देखरेख यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत होण्याच्या प्रक्रियेवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लवकरात लवकर कामकाज सामान्य करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech