ईदेच्या शुभेच्छा दिल्या आणि हल्ल्यांचा केला निषेध
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांना ईद आणि नौरोजच्या शुभेच्छा दिल्या. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी नांदावी, अशी आशा व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट लिहून माहिती दिली आहे. याप्रसंगी दूरध्वनीवर संवाद साधतांना पंतप्रधानांनी इरणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. असे हल्ले प्रादेशिक स्थिरतेसाठी धोकादायक ठरत असून जागतिक पुरवठा साखळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी समुद्री मार्गांची मुक्तता कायम ठेवण्यावरही भर देण्यात आला. व्यापार सुरळीत चालण्यासाठी जलमार्ग खुले आणि सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, नौरोजच्या निमित्तानेही पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी कामना व्यक्त केली. नौरोज हा पारशी आणि इराणी समुदायाचा नववर्षाचा सण असून वसंत ऋतूच्या प्रारंभी साजरा केला जातो.