मुंबई पोलिसांची कमाल कामगिरी; हरवलेले ३३ हजारांहून अधिक मोबाईल मालकांच्या हाती

0

मुंबई : मुंबई पोलीस दलाची शौर्य आणि व्यावसायिकतेसाठी देशातच नव्हे तर जगभरात ख्याती आहे. अगदी किरकोळ तक्रार असो वा गंभीर गुन्हा, छडा लावल्याशिवाय न राहणारा हा पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हरवलेले मोबाईल शोधून परत देण्याच्या विशेष मोहिमेत मुंबई पोलिसांनी मोठे यश मिळवले असून तब्बल ३३,५१४ हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे १,६५० मोबाईल फोन हे केवळ उत्तर प्रदेशातील विविध भागांतून हस्तगत करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आजच्या काळात स्मार्टफोन ही अनिवार्य गरज बनली आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरी आणि लंपास होण्याचे प्रकार वाढलेले असताना, मुंबईसारख्या महानगरात एकदा फोन हरवला की तो परत मिळणे कठीण मानले जाते. मात्र या समजुतीला छेद देत मुंबई पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून काढत अनेक नागरिकांना आनंदाचा धक्का दिला आहे. रेल्वे, बस, सार्वजनिक कार्यक्रम किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरीला गेलेले हजारो फोन शोधून काढण्यात पोलिसांनी सातत्याने काम केले.

मुंबई पोलिसांनी सामाजिक माध्यमांवर माहिती देताना सांगितले की “मुंबईत हरवले आणि उत्तर प्रदेशात सापडले” अशी ही मोहीम ठरली. सुमारे दोन कोटी रुपयांच्या किमतीचे १,६५० मोबाईल फोन उत्तर प्रदेशातील विविध भागांतून जप्त करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत जप्त केलेले फोन पडताळणी करून मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दूरसंचार विभागाच्या सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या मदतीने आयएमईआय (IMEI) क्रमांकाद्वारे या मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला. तंत्रज्ञान आणि पोलिसांच्या समन्वयातून राबवलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी बळकट झाला असून मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech