मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रचाराचा आज, मंगळवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे राज्यात संध्याकाळी ५.३० वाजता प्रचार थांबला. परंतु, उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मोठा रोड शो केला. बुलेट मोटारसायकलवरून त्यांनी रॅलीत सहभाग घेतला आणि निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असा दावा केला. त्यांनी बीएमसीची सूत्रे मराठी हातात राहतील असे स्पष्ट केले.राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजता आटोपली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारसभा, रॅली इत्यादी बंद झाले.
गुरुवारी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र मतदानाच्या तोंडावर निवडणूक आयोगाने प्रचार कालावधी संपल्यावरही उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क करण्याची परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या निर्णयानुसार प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवार मतदारांना भेटू शकणार आहेत, मात्र त्यांना पक्षाची पत्रके वाटता येणार नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यात सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी महापालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये हा निर्णय नमूद आहे. मात्र विरोधी पक्ष काँग्रेस तसेच अन्य लोकांनीही यावर आक्षेप घेतला. याआधी अशा प्रकारे निवडणूक आयोगाने कधी निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे आता असा अजब निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने हा आदेश आता काढला नसून २०१२पासून अमलात आहे. उमेदवार जमावबंदीच्या आदेशाचे पालन करून घरोघरी जाऊन मतदारांना भेटू शकतात व त्याच्याशी चर्चा करू शकतात.
राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान मराठी अस्मिता, आघाडीची ताकद आणि मुंबई महापालिकेवरील सत्ता यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गज नेते मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण आणखी तापले होते. या महापालिका निवडणुका फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नव्हेतर, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेची खरी कसोटी मानल्या जात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने गुरुवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली असून मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार आहे. निकाल १६ जानेवारीला जाहीर होईल.