सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

0

मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी
मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

मतदान यंत्रांची हातळणी काळजीपूर्वक करण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी २४ तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. सुरक्षा उपकरणे (उदा. गोदामाच्या प्रवेद्वाराबाहेरील सीसीटीव्ही, सुरक्षा आलार्म सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा इ.) व्यवस्थित कार्यांन्वित असल्याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे. त्याचबरोबर निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामाचे प्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी, असेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले; तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech