मुंबई : आताच्या पाकिस्तानातील कोटला सुलतान सिंह येथे २४ डिसेंबर १९२४ रोजी सर्वसाधारण कुटुंबात जन्माला येऊन तमाम भारतीय रसिकांच्या ह्रुदय सिंहासनावर विराजमान झालेल्या स्वर्गीय सुरांचा बादशाह मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा नजराणा ‘मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब’ने रसिक श्रोत्यांसमोर सादर करुन अनोखी स्वरांजली वाहिली. भारतीय लष्करातून सेवानिवृत्त होऊन आपल्या ह्रदयावर शस्त्रक्रिया केल्यानंतरही मोहम्मद रफी यांच्या आवाजाची याद तरोताजा करणारे प्रदीप शिंदे, रफीच्या सूरस्वरांना गवसणी घालणारे राजन पट्टन आणि लतादीदी आणि आशाताई यांचा सूरमयी गळा लाभलेल्या संगीता मिरकर आणि रश्मी मुळे यांनी रवि मल्ल्या, शिरीष वराडकर या तरुणांनाही लाजविणाऱ्या जोडगोळीने ‘मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब’द्वारा आयोजित ‘मर्फीची बर्फी’ हा कार्यक्रम तुफान गाजविला. रवि मल्ल्या यांनी मोहम्मद रफी यांच्या जीवनातील लतादीदींबरोबरचा संघर्ष, शंकर जयकिशन बरोबर झालेले वादविवाद पुन्हा या दिग्गज सूर स्वरांच्या पुजाऱ्यांबरोबर झालेली दिलजमाई, मोहम्मद रफी यांच्या संपूर्ण कारकीर्दिला देण्यात आलेला उजाळा यामुळे मोहम्मद रफी यांच्या नावाची ‘मर्फी’ आणि लोकप्रिय गाण्यांची रसिकांना वाढलेली सुमधुर ‘बर्फी’ अतीशय कर्ण चविष्ट झाली होती.
निर्माती वृंदा मल्ल्या यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि भूषण मुळे यांच्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करुन बोरीवली पश्चिम येथील एक्सर जवळील राधे कृष्ण संगीतालयाच्या भरगच्च सभागृहात या अनोख्या स्वरांजलीने संध्याकाळ यादगार बनविली. गुजराती वृत्तपत्र सृष्टी तद्वतच गुजराती रंगभूमी, चित्रपट सृष्टीत आणि वाहिन्यांवरील मालिकांमधून घरोघरी पोहोचलेल्या उदयोन्मुख अभिनेत्री जिग्ना वैद्य या यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. रवि मल्ल्या यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या पुस्तकाने अभिनेत्री जिग्ना वैद्य यांना सन्मानित केले. रवि मल्ल्या यांनी नुकत्याच बोर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्तरी ओलांडलेल्या क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत मारलेल्या उत्तुंग षटकाराचे विलोभनीय छायाचित्र प्रदान करीत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई आणि उद्योजक गजानन वावीकर यांनी आपल्या सहकारी बांधवांसह मल्ल्या पती पत्नी यांचा सन्मान केला. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा दारुण पराभव करणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघाचा भारतीय गोलंदाज सौरभ नेत्रावळकर यांचे पिताश्री नरेश नेत्रावळकर, सुधीर गावडे, प्रदीप मिरकर, शाम कदम यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात ‘मर्फीची बर्फी’ या अनोख्या स्वरांजलीला दाद दिली.