‘एआय’च्या माध्यमातून दाखवलेले बाळासाहेबांचे भाषण हा डिजिटल फ्रॉड – नरेश म्हस्के

0

ठाणे : मतांसाठी उबाठा कुठल्याही थराला जाऊ शकतात. उद्या हे बाळासाहेबांचे हिरवी शाल आणि डोक्यावर विणलेली टोपी घातलेले फोटेही ‘एआय’चा वापर करून तयार करतील. शिल्लक सेना हा चायनीज माल असून तो आता जनतेत खपणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. नाशिकमधील मेळाव्यात ‘एआय’चा वापर करुन दाखवलेले बाळासाहेबांचे भाषण हा डिजिटल फ्रॉड आहे. या डिजिटल फ्रॉडच्या विरोधात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार म्हस्के म्हणाले की, एका विमा कंपनीची ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ अशी जाहिरात आहे. उद्धव ठाकरेंचे अगदी तसेच झाले आहे. त्यांनी बाळासाहेबांना ‘जिंदगी के साथ भी’ मनस्ताप दिला आणि आता ‘जिंदगी के बाद भी’ मनस्ताप देत आहेत. उद्धव ठाकरे यांची साहेबांवरील निष्ठा बनावट आणि कृत्रिम होती. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा आधार घ्यावा लागला. उबाठाचे वागणे नकली, हृदय नकली, हृदयातल्या भावना नकली, त्याच्या भोवतालचे नेते नकली, त्यांचा पक्ष नकली आणि म्हणूनच त्यांना नकली आवाजाचा आश्रय घ्यावा लागला, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी उबाठावर केली. अक्कल गहाण पडली की अशी नक्कल सुचते, असा टोला त्यांनी लगावला.

बाळासाहेब आज हयात असते तर त्यांच्या ओरिजनल आवाजात त्यांनी उद्धव ठाकरेंची हजामत केली असती. ते म्हणाले असते, ज्या काँग्रेसला मी गाडायला निघालो होतो, त्या काँग्रेसला वाढायला तू मदत करत आहेस. बाळासाहेबांनी पक्ष विकल्याबद्दल उबाठाच्या कमरेत लाथ घातली असती, असे खासदार म्हस्के म्हणाले.

हिऱ्यापोटी जन्मलेल्या गारगोट्यांनी कितीही आव आणला तरी हिरा होत नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीत तयार झालेले एकनाथ शिंदे हेच खरा हिरा आहेत. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब हे आमचं दैवत होते, आहेत आणि आजन्म राहतील. त्यांच्या नकली आवाजाची आम्हाला गरज भासणार नाही. कारण त्यांचा असली आवाज आमच्या हृदयात आहे. अस्सल शिवसैनिकांच्या मनामनात आहे. उबाठाकडे निदान खोटेपणा करुन विकण्यासाठी त्यांचे वडील तरी आहेत. पण तुम्ही दाखवताना आतापर्यंत तुमच्या वडिलांना ज्या भूमिका बदलल्या त्या दाखवणार का, असा खोचक टोला खासदार म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech