गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे जवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारला होता. हा तळ गडचिरोली पोलिसांच्या सी-६० जवानांनी उध्वस्त केला . तळ उध्वस्त झाल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा पोलिसांनी दिला आहे. भामरागड परिसरात नक्षलवाद्यांनी तळ उभारल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० चे सुमारे २०० जवानांचे विशेष अभियान रविवारी संध्याकाळी राबवण्यात आले.
दरम्यान आज, सोमवारी सकाळी याच परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला. सी-६० जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती. चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमे दरम्यान मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांचा शस्त्रासाठा जप्त करण्यात आला. यात एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जर इ. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू आढळून आले. सदर माओवादी तळ सी-६० जवानांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला आहे. दरम्यान या परिसरात अजूनही चकमक सुरूच आहे. पोलिसांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकचा तपशील कळू शकेल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.