भुवनेश्वर : ओडिशाच्या राऊरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल १५०० किलो स्फोटके असल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवादी वाहनचालकासह हा ट्रक घनदाट जंगलात घेऊन गेले आहेत. गेल्या काही काळापासून सुरक्षा दलांनी जोरदार कारवाया करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु, त्यांचा पुरता बीमोड झालेला नसून सुरक्षा दल आणि सरकारसमोर त्यांच्या आव्हान कायम आहे. अशातच नक्षलवाद्यांनी ओडिशाच्या राऊरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल १५०० किलो स्फोटकं आहेत. या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशापोलीस सतर्क झाले आहेत. नक्षलवाद्यांनी लुटलेला ट्रक हा राऊरकेला येथील केबलांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांको दगड खाणीकडे जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी ट्रक अडवून त्यामधील चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर ट्रक जबरदस्तीने सागंडा येथीलल घनदाट जंगलांच्या दिशेने नेला. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात घडक कारवाई सुरू केली आहे. त्यात अनेक मारले गेले आहेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र तरीही महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओदिशा राज्याच्या काही भागात नक्षलवाद्यांचं आव्हान कायम आहे.