मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. प्रथेनुसार पहिल्या दिवशीच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्यासह माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर महालप्पा पटने आणि नीला पदमाकर देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना भावनिक आठवणी सांगितल्या. १९९१ पासून परिचय असलेल्या आणि २००२ पासून विधान परिषदेत एकत्र काम केलेल्या अजितदादांच्या सहवासातील अनेक प्रसंगांना त्यांनी उजाळा दिला. विरोधी पक्षात असतानाही अजित पवार यांनी जनतेचे प्रश्न मांडले आणि निधी नसतानाही सामाजिक मुद्दे सोडवण्यासाठी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.
लवासा परिसरातील गावकऱ्यांना वीजपुरवठा मिळावा यासाठी अजितदादांनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतल्याचा प्रसंगही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितला. मतभेद असले तरी वैयक्तिक कटुता कधी जाणवली नाही. २०१९ मध्ये उपसभापतीपदी बिनविरोध निवड होताना मिळालेले सहकार्य आणि कोविड काळात रुग्णालयांच्या बिलांबाबत दिलेली मदत यांचाही उल्लेख केला. “राजकारणात भूमिका वेगळ्या असू शकतात, पण समाजकारणाच्या प्रश्नांवर अजितदादांची भूमिका सर्वसमावेशक होती,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचे मुद्दे संयमाने ऐकून घेण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष होती, असेही त्यांनी नमूद केले.
इतर दिवंगत नेत्यांबद्दल बोलताना सुरूपसिंग नाईक यांनी नंदुरबार-नवापूर भागात आर्थिक विकास आणि व्यसनमुक्ती क्षेत्रातील योगदान सांगितले. अशोक मोडक ठाम राष्ट्रवादी विचारांचे आणि ऐतिहासिक स्मारक विषयांवर सातत्याने भूमिका मांडणारे होते. गंगाधर पटने यांनी ग्रंथालय चळवळ उभी करण्यात महत्त्वाचे योगदान दिले, तर शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदारांपैकी नीला देसाई प्रभावी वक्त्या आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या कार्यकर्त्या होत्या.
शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले. “दुःख एका पक्षाचे नसते, संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र राहण्याची गरज आहे,” असे आवाहन करत त्यांनी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर झालेल्या सार्वजनिक टीकेवरही टीका केली. “वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगी सुतक किती दिवस पाळायचे हा कुटुंबाचा प्रश्न आहे; त्यावर टीका करणे योग्य नाही,” असे ते म्हणाल्या. राज्य नेतृत्व परिस्थिती संयमाने हाताळत असल्याचे सांगत पवार कुटुंबीयांच्या धैर्याचे आणि कार्यकर्त्यांच्या भावनिक आव्हानांचेही उल्लेख केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृह भावनिक वातावरणात होते, ज्यात अजितदादांच्या आठवणींनी सर्वांना एकत्र आणले.