राजस्थानचा महेशकुमार देशात अव्वल
नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (एनटीए) ने घेतलेल्या नीट-यूजी परीक्षेचा निकाल आज, शनिवारी जाहीर करण्यात आला. निकालांसोबत टॉपर्सची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर्षी नीट-यूजी परीक्षा सुमारे २०.८ लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.यामध्ये राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल ठरला आहे. तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा आणि महाराष्ट्राच्या कृषांग जोशीने तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुलींमध्ये अविका अग्रवाल सर्वाधिक गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले अहो. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनीही या टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट-यूजी परीक्षेसाठी सर्व श्रेणींसाठी कटऑफ गुण जाहीर केले आहेत. या वर्षी खुला प्रवर्ग आणि इडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी कटऑफ गुण ६८६ ते १४४ दरम्यान निश्चित केले आहेत. याशिवाय ओबीसी, एसी आणि एसटी श्रेणींसाठी नीट-यूजी २०२५ चा कटऑफ गुण १४३ ते ११३ दरम्यान निश्चित केला आहे. उमेदवार neet.nta.nic.in ला भेट देऊन आपला निकाल पाहू शकतात.