पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू; गोऱ्हे यांचे चौकशीचे निर्देश

0

पालघर : डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकरणी प्रसारमाध्यमांमध्ये २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सदर महिलेला प्रसूतीसाठी वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्या नसल्याने व त्यानंतरही आवश्यक उपचार न मिळाल्याने तिचा व बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच केनाळ बायगुडा व परिसरातील आरोग्य केंद्रांत आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व औषधोपचार तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. यासोबतच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचेही त्यांनी सुचवले आहे. “ही घटना केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे,” असे मत व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech