कल्याण-डोंबिवली भाजप शिवसेनेचे नऊ नगरसेवक बिनविरोध विजयी

0

भाजपाचे पाच शिवसेनेचा चौकार

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेत १५ जानेवारी रोजी मतदान होण्याआधीच शिवसेना-भाजप युतीने एकूण नऊ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत. यामध्ये भाजपच्या पाच नगरसेवकांचा समावेश असून शिवसेनेनेही बिनविरोध नगरसेवक निवडीचा चौकार ठोकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या यशस्वी रणनीती बिनविरोध निवडीसाठी कामाला आल्याचे बोलले जाते. भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संवाद साधला व त्यांचे अभिनंदन केले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे बिनविरोध निवडून आलेल्या चारही शिवसेनेच्या नगरसेवकांची संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

महापौर आपल्याच पार्टीचा बसविण्यासाठी सर्वच पक्षात जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत. महायुती – महाआधाडी यासाठी मजबूत बांधणी करीत आहे. परंतु उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर एकूण चित्र वेगळेच दिसून येत आहे. अर्ज मागे घेण्याची उद्या शेवटची मुदत असतानाच महायुतीचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामध्ये भाजपाचे पाच तर शिवसेना (शिंदे गट) चार उमेदवार आहेत. मात्र आजही युतीचाच महापौर बसेल असे नेते सांगत आहेत. गुरुवारी झालेल्या अर्ज स्कूटिनीनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारेचडोंबिवली विभागातील पॅनल क्रमांक २७ अ मधून मंदाताई सुभाष पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २४ ब मधून ज्योती पवन पाटील याही भाजपाच्याच महिला उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यामुळे डोंबिवलीतील एकूण बिनविरोध उमेदवारांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे.

तर डोंबिवली पश्चिम प्रभाग क्र. २४ मधून महायुतीचे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. यामध्ये शिवसेनेचे रमेश सुकर्‍या म्हात्रे व विश्वनाथ वसंत राणे, सौ. वृषाली रणजीत जोशी तर भाजपाचे सौ. ज्योती पवन पाटील या क.डों.म.पा. नगसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव हर्षल राजेश मोरे हे ही डोंबिवली विभागातील पॅनेल क्र. २८ – अ मधून बिनविरोध विजयी झाले. या प्रभागातून सर्व अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने हर्षल राजेश मोरे यांचा मार्ग मोकळा झाला. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या तिन्ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या तिन्ही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech