नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंतच्या डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत असून, पर्यटक बर्फाचा आनंद घेत असले तरी स्थानिक नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक भागांत दोन ते तीन फूटांपर्यंत बर्फ साचल्याने अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या मैदानी भागात सुमारे एक फूट बर्फवृष्टी नोंदवण्यात आली असून, उंच पर्वतीय भागात दोन ते तीन फूट बर्फ पडला आहे. भूस्खलन, झाडे कोसळणे आणि जाड बर्फ साचल्यामुळे महामार्ग व संपर्क रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमान शून्याखाली घसरले आहे. जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जम्मू–श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) बंद करण्यात आला असून, उधमपूरमधील जखानी चौकातही वाहतूक थांबवण्यात आली आहे.
बारामुल्ला, बडगाम आणि रामबनमधील बटोटे या पर्वतीय पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने संपूर्ण परिसर पांढऱ्या शुभ्र चादरीने झाकला गेला आहे. बर्फवृष्टीचा फटका हवाई सेवांनाही बसला असून, श्रीनगर विमानतळावरून ये-जा करणाऱ्या अनेक उड्डाणांना इंडिगो एअरलाइन्ससह काही कंपन्यांनी तात्पुरती स्थगिती व रद्द केले आहेत. श्रीनगर विमानतळाच्या सोशल मीडिया हँडलवरून प्रवाशांसाठी सूचना जारी करण्यात आली असून, दिल्ली विमानतळावरील NOTAM आणि श्रीनगरमधील खराब हवामानामुळे काही उड्डाणे रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या विमानसेवेकडून अद्ययावत स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच उत्तराखंडच्या नैनीताल, उत्तरकाशी आणि टिहरी गढवाल जिल्ह्यांतील उंच भागांत अनेक ठिकाणी वाहने व नागरिक अडकले आहेत. हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ५३५ रस्ते बंद झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणावर बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी बचावकार्य वेगाने सुरू केले आहे. रामगढ–मुक्तेश्वर आणि धनाचूली बँड परिसरात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनच्या मदतीने रस्त्यावरील बर्फ हटवण्यात आला असून, सुमारे २० ते २५ वाहने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आहेत.