तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राहणार उपस्थित

0

नवी दिल्ली : बांग्लादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभात भारताकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रतिनिधित्व करणार आहेत. ही माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी बीएनपी अध्यक्षांच्या शपथविधीसाठी शेजारी देशाला भेट देऊ शकतात अशी चर्चा होती मात्र, भारतात आयोजित एआय इम्पॅक्ट समिट तसेच अनेक देशांच्या मान्यवरांच्या आगमनासह इतर नियोजित कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदी बांग्लादेशला जाऊ शकणार नाहीत. १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक आधीपासून निश्चित आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ढाका येथे बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील. या महत्त्वाच्या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षांचा सहभाग भारत आणि बांग्लादेशमधील जनतेतील दृढ मैत्री दर्शवतो आणि दोन्ही देशांना जोडणाऱ्या लोकशाही मूल्यांप्रती भारताची कटिबद्धता अधोरेखित करतो.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सामायिक इतिहास, संस्कृती आणि परस्पर सन्मानाने जोडलेले शेजारी म्हणून भारत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या सरकारचे स्वागत करतो. त्यांच्या दृष्टीकोनाला आणि मूल्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. राजनैतिक सूत्रांच्या माहितीनुसार, आमंत्रित देशांच्या यादीत भारत, चीन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांचा समावेश आहे. शपथविधी समारंभ संसद भवनाच्या साउथ प्लाझामध्ये आयोजित केला जाणार आहे.

शेजारी देशात नुकत्याच झालेल्या १३व्या राष्ट्रीय निवडणुकीत बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यानंतर १७ फेब्रुवारी, मंगळवारी तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या मंत्रिमंडळात ३२ ते ४२ सदस्यांचा समावेश असू शकतो आणि त्यात अनुभवी तसेच युवा नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech