मुंबई : बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. या कारवाईत दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात नवविवाहित जोडप्यांना लक्ष्य केले होते. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन होते. ‘सिंदूर’ हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचे प्रतीक आहे. तसेच, योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे. भारतीय लष्कराने या कारवाईची घोषणा करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचे महत्त्व सांगितले. जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने मंगळवारी मध्यरात्री प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला.
भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून केलेल्या या कारवाईनंतर संरक्षण मंत्रालयाने एक प्रेस रिलीज करत याबाबत माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव या हल्ल्यातील बळी पडलेल्या आणि बचावलेल्या नागरिकांच्या प्रती आदर व्यक्त करते. या नावातून हे स्पष्ट होते की, भारत निरपराध लोकांच्या मृत्यूचा बदला घेत आहे. सिंदूर हे विवाहित स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचे प्रतीक आहे. ते तिच्या पतीच्या अस्तित्वाचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत सिंदूरला विशेष महत्त्व आहे. काही परंपरांमध्ये सिंदूर देवी पार्वतीशी संबंधित आहे. पार्वतीला वैवाहिक जीवनातील समर्पणाचे प्रतीक मानले जाते. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य केले. त्यांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
ही घटना बैसारणच्या घाटामध्ये घडली. हे ठिकाण नवविवाहित जोडप्यांचे आवडते ठिकाण आहे. या हल्ल्यात हिमांशी नारवाल या नवविवाहित महिलेचे पती लेफ्टनंट विनय नारवाल शहीद झाले. लग्नाच्या केवळ सहा दिवसांतच हिमांशीने आपला पती गमावला. या घटनेनंतर हिमांशी सिंदूरशिवाय दिसली, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेमुळे भारताचा निर्धार अधिक दृढ झाला. दहशतवाद्यांनी दिलेला संदेश भारताने चोख प्रत्युत्तर देत परत पाठवला. भारताने हे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिले.